Sushil Kumar Shinde
Sushil Kumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur विमानसेवा-‘सिद्धेश्वर’ची चिमणी वादात सुशीलकुमार शिंदेंची उडी : म्हणाले, ‘हे फुजूल आहे सगळं...’

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar factory) चिमणी आणि विमानसेवा यावरून सोलापुरात (Solapur) सध्या रणकंदन माजले आहे. त्या वादात आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी उडी घेतली आहे. ‘होटगी रोडवरील विमानतळावरून (Airport) विमान सेवा सुरु होण्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही,’ असे सांगून प्रवासी विमान सेवा सुरू होण्याबाबत ज्यांची ताकद आहेत, त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचनाही ज्येष्ठ नेते शिंदे यांनी केली. (Chimney of Siddheshwar factory not a hindrance to Solapur's air service : Sushil Kumar Shinde)

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सध्या सुरू असलेला वाद हा निरर्थक आहे. मी अनेकवेळा विमानातून आलो आणि गेलो. पण तेव्हा कधी हा प्रश्न आला नाही. आता अलीकडे माझ्या ७५ चा कार्यक्रम झाला, तेव्हा २८ विमानंं लॅडिंग झाली होती. तेव्हा असा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता. उलट ज्यांचं वजन आहे, अशा लोकांनी प्रवासी विमान सेवेबाबत संबंधित कंपन्यांकडे प्रयत्न केले पाहिजेत. होटगी रोडवरील विमानतळावरून विमान सेवा सुरु होण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही. आम्ही बऱ्याचदा त्याच विमानतळावर उतरतो, आजही उतरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बोरामणी विमानतळाबाबत मी माझ्या काळात प्रयत्न केले. पण, पुढे पाठपुरावा करणे गरजेचे होते, असे सांगून शिंदे म्हणाले की, बोरामणी विमानतळासाठी २०१० पासून भूसंपादानाचे काम सुरू झालं. जमीन ताब्यात आल्यानंतर विमानतळाच्या संरक्षक भिंतीचे काम झालं. मी २०१४ पर्यंतच होतो, त्यानंतरचं मला माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात विमानसेवा आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी यावरून वाद पेटला आहे. त्याच वादावर आता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले. हे सर्व फूजूल आहे, असे म्हणत सोलापुरातून विमान सेवा सुरू होण्यास कोणताही अडथळा मला तरी वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी विमानसेवेसाठी चक्री उपोषण करणारे सोलापूर विकास मंचचे विकास शहा यांना सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी भरचौकात पिस्तूल काढून धमकावले होते. त्यानंतर मोठा वाद सोलापुरात झाला होता. मात्र, शिंदे यांनी एका फटकाऱ्यात सर्व विषय मोडीत काढत सोलापुरात विमानसेवा सुरू होण्यास अडथळा नसल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT