CM Eknath Shinde, Devendra fadnavis and Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापुरातील थेट पाइपलाइनच्या श्रेयवादात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उडी

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूरच्या जिव्हाळ्याच्या समजल्या जाणाऱ्या थेट पाइपलाइन योजनेच्या श्रेयवादाची लढाई माजी पालकमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यात सुरू असताना, त्यात आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी उडी घेतली आहे. हे तिघेही थेट पाइपलाइनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी चार डिसेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

नवीन थेट पाइपलाइनचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे ४ डिसेंबर २३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र येथे त्याची जय्यत तयारी सुरू आहे.

काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील यांचा मंगळवारी कृतज्ञता सोहळा दसरा चौकात पार पडला. थेट पाइपलाइनच्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी मोठा सोहळा साजरा करत असताना शहरातील प्रमुख चौकात कृतज्ञतापूर्वक बॅनरबाजी झळकली होती.

गेली नऊ वर्षे थेट पाइपलाइन योजना रखडली होती. योजना मंजुरीपासून ते काम पूर्ण होईपर्यंत आमदार सतेज पाटील यांचा या योजनेतील सहभाग महत्त्वाचा होता. कोल्हापूरकरांना यंदाच्या दिवाळीत हे पाणी मिळाल्याने सतेज पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाणी येताच मोठा जल्लोष केला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहात पाण्याचे स्वागत केले होते, तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हे कोणा एकट्याचे श्रेय नाही, असा टोला लगावला होता.

थेट पाइपलाइनबद्दल श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यात उडी घेतली आहे. विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधीच लोकार्पण करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT