Bhima River Flood Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhima River Flood : मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही त्या जयकुमार गोरेला इथना घालवा : भीमा नदीकाठचा शेतकरी संतापला...

Farmer Angry On Jaykumar Gore : भीमा नदीच्या पुरामुळे उसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत थेट आवाहन केले.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 02 August : भीमेला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे, उन्हाळ्यात विजेअभावी पाणी न मिळाल्यामुळे ऊस छोटा राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे, असाच संताप, राग त्या शेतकऱ्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काढला आहे. त्यात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करताना ‘मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही त्या जयकुमार गोरेला इथना घालवा आणि आम्हाला दुसरा माणूस द्या,’ असे म्हटले आहे. त्या तरुण शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संबंधित शेतकऱ्याने व्हिडिओ करून आपले दुःख मांडलं आहे. त्यात व्हिडिओमध्ये तो तरुण शेतकरी म्हणतो की, भीमा नदीच्या पुरामुळे तीन किलोमीटर बॅकवॉटर नदीलगतच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात आलं आहे. पूर आम्हाला काही नवी नाही. दरवर्षी आमच्याकडे पूर येतो. पण दरवर्षीचा आणि या वर्षीच्या पुरात फरक आहे.

दरवर्षी उसाची चांगली वाढ झालेली असायची. त्यामुळे ऊस पाण्यात गेला तरी त्याचे तेवढे नुकसान होत नव्हतं. यावर्षी उसाचं सगळं नुकसान होणार आहे. कारण उन्हाळ्यात भीमा नदीकाठावरील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला, त्यामुळे ऊसाला पाणी देता आलं नाही आणि उसाची वाढ झाली नाही. आता ज्या स्थितीत ऊस आहे, तो जर पाण्यात बुडाला तर तो सर्वच सर्व ऊस जळून जातो, त्यामध्ये काहीसुद्धा राहत नाही, असेही त्या शेतकऱ्याने पोटतिडकीने सांगितले.

त्या जयकुमार गोरेला सोलापूरची इकॉनमी कशी चालते, याबाबत काही ज्ञान नाही. ते आलंय बाहेरनं, माळरान भागातून. त्याला इथली अवस्था काय आहे, हे माहिती नाही. सोलापूर शहराला पाणी देण्याच्या नावाखाली उन्हाळ्यात तुम्ही भीमा नदीकाठच्या सर्वच शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा बंद करता आणि पावसाळ्यात आम्हाला दानाला जावं लागतं, असं दुःखही त्यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, आम्हाला काय पूर नवीन नाही, आम्हाला पुराची सर्व माहिती आहे. भीमा नदीपासून तीन किलोमीटरपर्यंतची शेती पाण्यात जात असेल तर सर्व बाजूंनी किती ऊस आणि शेती पाण्यात जात असेल. किती शेतकऱ्यांचा नुकसान होत असेल. मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही प्रशासनाला नीट धोरणाने इथली इकॉनमी सांभाळयला सांगा. नाही ती लोकं आमच्या बोकांडी आणून बसवली आहेत. हा राजकीय मुद्दा नाही तर मी सर्वसामान्य शेतकरी म्हणून बोलतोय, तुम्ही आमची दखल घेतली पाहिजे.

उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने भीमा नदीकाठचा ऊस मोठ्या प्रमाणात कोवळा राहिलेला आहे. हा ऊस भीमा नदीच्या पुरात राहतो का? उन्हाळ्यात या उसाला पाणी मिळालं असतं तर चार कांड्या वाढल्या असत्या आणि पुरात तो ऊस टिकला असता. हा राजकीय मुद्दा नाही, मी सर्वसामान्य शेतकरी म्हणून बोलतोय. जर तुम्ही आमची दखल घेतली नाही तर शेतकरी तुमची दखल घेणार, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्या शेतकऱ्याने दिला आहे.

(पाण्याखाली गेलेला मूग दाखवत) यात मूग पेरला होता, शेतकऱ्याने. तो राहिला आहे का आता? काय करायचं, तुम्ही उन्हाळ्यात वीज पुरवठा केला असता तर या शेतकऱ्यांनी ऊस लावला असता. तुम्ही वीजपुरवठा केला नाही; म्हणून या शेतकऱ्याने मूग केला. त्यात आता कंबरएवढं पाणी आहे. आता त्याने काय करायचं?

प्रत्येक गोष्टीत राजकारण करता. सोलापूर शहराला पाणी सोडण्याच्या नावाखाली प्रत्येक वेळी तुम्ही नदीकाठची सुपीक जमीन पडीक ठेवणार का? तिथलं इकॉनमी बंद ठेवणार का? पुरामुळे झालेले शेतकऱ्यांचं नुकसान तुमच्या शासकीय भरपाईने भरून निघणार आहे का? असा तिखट सवालही या शेतकऱ्याने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT