Mumbai, 30 April : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतलेली भूमिका वाद्ग्रस्त ठरली होती. पोलिसांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना केलेल्या धक्काबुक्कीचे तीव्र पडसाद विधीमंडळासह संपूर्ण राज्यात उमटले होते. शिवसेना, राष्ट्रवादीने आवाज उठवल्यानंतर सुरुवातीला तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना रजेवर पाठवले होते, त्यानंतर त्यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. ती बदली कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, याचा गौप्यस्फोट खुद्द मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्याची विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर दोशी यांची बदली करण्यात आली. मात्र, तुषार दोशी यांची ही बदली शिक्षा म्हणून करण्यात आलेली नाही. त्यांची नियमित बदली करण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. त्याचे तीव्र पडसाद विधीमंडळात उमटले होते. तसेच राज्यभरातून निषेधाची भूमिका मांडण्यात आली.
विधान परिषदेत देसाई यांनी भूमिका मांडल्यानंतर तत्कालीन उपसभापती नीलम गोऱ्हे तुषार दोशी यांना निलंबत करण्याचे आदेश सरकारला दिले होते. मात्र, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपसभापतींचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे दोशींच्या पाठीशी भाजप नेते उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीनंतर दोन दिवस दोशी हे रजेवर गेले होते. त्यानंतर ते कामावर रुजू झाले होते. पण काही दिवसांनंतर ते पुन्हा अर्जित रजेवर गेले होते. मात्र, दोशी पुन्हा कामावर आले होते, त्यामुळे दोशी साताऱ्यात कायम राहणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. अचानक पुन्हा तुषार दोशी यांची सांगलीत बदली झाली आहे.
तुषार दोशींच्या बदलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदली एकट्या तुषार दोशी यांची करण्यात आलेली नाही, तर त्यांच्यासोबत इतर चार-पाच जणांचीही करण्यात आली आहे. हे खरं आहे की, साताऱ्यात जे काही वातावरण तयार झालं होतं, त्या वातावरणात दोशी यांनाही काम करणं कठीण गेलं असतं. दररोज पालकमंत्री शंभूराज देसाई आणि दोशी यांनी समोरासमोर यायचं आणि त्यांच्या मनात ह्यांच्याबद्दल आणि ह्यांच्या मनात त्यांच्याबद्दल...
एकनाथ शिंदे यांनी मला विनंती केली, आपण त्याबाबत विचार करा. म्हणून तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. पनीशमेंट (शिक्षा) म्हणून तुषार दोशी बदली करण्यात आलेली नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.