Amol Mitkari  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार अमोल मिटकरी अडचणीत; टिंगल करणं महागात पडण्याची चिन्हे

मिटकरींच्या विरोधात न्यायालय आणि मुख्य सचिवांकडे तक्रार

सरकारनामा ब्युरो

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे अडचणीत आले आहेत. हिंदू परंपरेनुसार होणारे विविध विधी व त्यामधील कन्यादान याची जाणीवपूर्वक टिंगल केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. याचबरोबर मिटकरींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगीही राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागण्यात आली आहे. या यामुळे टिंगल करणं मिटकरींना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

विद्याधर मोरेश्वर कुलकर्णी यांनी मिटकरींच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल दिली असून, याप्रकरणी ७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मिटकरी यांच्यावर कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करावा, यासाठी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. कुलकर्णी यांनी सचिवांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आमदार मिटकरी यांच्याविरुद्ध इस्लामपूर येथील न्यायालयात ९ मे रोजी खासगी फिर्याद दाखल केली आहे. न्यायालयासमोर प्रथम आदेशासाठी फिर्याद घेणे अजून प्रलंबित आहे. त्यासाठी कलम २९५ (अ) प्रमाणे सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९६ प्रमाणे खासगी फिर्याद चालवण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी द्यावी.

मिटकरी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांनी २१ एप्रिलला इस्लामपूर येथील संवाद सभेत भाषण करताना हिंदू विवाह परंपरा व चालीरीती यापैकी कन्यादान विधीची खिल्ली उडवली होती. विवाह लावणारे पुरोहित हे वधू व वराचा हात हातात घेऊन वराला मम भार्या समर्पयामी म्हणायला लावतात, म्हणजे माझी पत्नी घेऊन जा, असा अर्थ होतो असे मिटकरींना सांगितले होते. परंतु, पुरोहित असा कुणाचाही हात हातात घेत नाहीत. तसेच, जो मंत्र म्हणायला लावला असे त्यांचे म्हणणे आहे, तो मंत्र विधीत नाही, असे त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.

मिटकरींनी भाषणात टिंगल व हावभाव केले, त्यातून हिंदू धर्मावर विश्वास असणाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांचे कृत्य सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. लोकप्रतिनिधी असल्याने सावधपणे बोलायला हवे होते. कायद्यासमोर सर्व समान आहेत याची त्यांना जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. राज्यघटना परिच्छेद क्रमांक १९४२/२ नुसार त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात कोणतीही बाधा नाही, असेही कुलकर्णी यांनी तक्रारीत म्हटले आहे. कुलकर्णी यांनी गृहसचिव, गृह मंत्रालय यांनाही हा अर्ज पाठवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT