Sanjay Shirsat -Ambadas Danve-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : महाआघाडीच्या वादात शिंदेंच्या मंत्र्याने तेल ओतले; ठाकरेसेनेकडून काँग्रेसचा अपमान...

Sanjay Shirsat Statement : अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नाराज असून संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील तणाव वाढला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 30 April : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत वाद पेटला आहे. त्यात तेल ओतण्याचे काम शिवसेनेचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. कोणतीही चर्चा न करता दानवेंना उमेदवारी जाहीर करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसचा अपमान केला आहे, असे काँग्रेसला डिवचणारे विधान केले आहे.

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी काँग्रेसला डिवचले आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी ही एकत्र नाहीच आणि त्यांच्यात एकवाक्यता कधीच नव्हती. कोणाला उमेदवारी दिली आणि कोण नाराज यापेक्षा तो पक्ष कुठे आहे ते शोधावे लागेल.

काँग्रेस पक्षाने यापूर्वी भूमिका स्पष्ट केली होती. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे त्यांनी कॉम्प्रमाईज केलं होतं. उद्धव ठाकरे विधान परिषदेला असतील, तर आम्ही कॉम्प्रमाईज करू, असं स्पष्ट सांगितलं होतं. मात्र, उमेदवारी जाहीर होईपर्यंत काँग्रेसला साधी सूचनादेखील दिली गेली नाही, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, काँग्रेसचा अपमान करण्याचे काम उबाठाने केले आहे. सर्व गेलं तरी चालेल मात्र आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, या भूमिकेत कदाचित काँग्रेस पक्ष असेल, त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढेल, असे आत्तातरी वातावरण आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही. आमच्याकडे रोज एवढे प्रवेश होत आहेत की, आम्हाला वेळ देता येत नाही. जे कार्यकर्ते येतात, ते स्वतःच्या मर्जीने येतात, त्याचा परिणाम विधान परिषदेत दिसेल.

...म्हणून ठाकरे निवडणुकीतून बाहेर पडले

उद्धव ठाकरेंना सर्व (जय-पराजयाची) प्रकारची जाणीव आणि माहिती असते. उबाठा संपवण्यासाठी त्यांच्या पक्षातील लोकच तयार आहेत. घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सेफसाईड म्हणून निवडणुकीतून बाहेर पडले, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

त्यासाठी एकनाथ शिंदे असावं लागतं

सुषमा अंधारे यांच्या स्टेटसबाबत मंत्री शिरसाट म्हणाले, सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली तरच त्यांनी कुर्बानी करावी. अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये. आम्ही 42 वर्षांपासून काम करतोय. एक-दोन दिवसांचा हा प्रवास नाही आणि त्यासाठी एकनाथ शिंदे असावे लागतात. त्यांनी ज्योती वाघमारे यांना स्वप्नात नसताना एका मिनिटात उमेदवारी देऊन राज्यसभेवर पाठवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT