Archana Janvekar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangale Election : हातकणंगलेत काँग्रेसचाच डंका; नगराध्यक्षपदी अर्चना जानवेकर बिनविरोध

Archana Janvekar Congress BJP : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच इच्छूकांनी तलवार म्यान केली.

Rahul Gadkar

Kolhapur : हातकणंगलेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. या पदावर अर्चना जानवेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरूवातीला निवडणुकीसाठी शड्डू ठोकलेल्या इच्छूकांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तलवारी म्यान केल्या. त्यामुळे जानवेकर यांचा विजय निश्चित झाला.

अरुणकुमार जानवेकर यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्यांनंतर नगराध्यपदासाठी पोटनिवडणूक लागली होती. सर्वपक्षीय नेत्यांच्या चर्चेनंतर जानवेकर यांच्या पत्नी अर्चना जानवेकर यांना बिनविरोध नगराध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र नेत्यांच्या शब्दाला छेद देत जवळपास आठ जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते.

हातकणंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाची निवडणूक लागणार हे जवळपास निश्चित होते. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच इच्छुकांनी आपल्या तलवारी म्यान करत अर्ज माघार घेऊन अर्चना जानवेकर यांना नगराध्यक्षपदी बिनविरोध केले.

नगराध्यक्षपदाची निवडणूक लागल्यानंतर अर्चना जानवेकर यांना नगराध्यक्षपदावर बिनविरोध करण्याच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्या होत्या. मात्र भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यात आला. काँग्रेसकडून अर्चना जानवेकर, भाजपकडून उज्‍ज्वला कांबळे, तर परशुराम गवळी, संदीप कांबळे आणि नंदा चौगुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते.

मंगळवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार हे जवळपास निश्चित होते. मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सुरेशराव हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे नेते अरुणराव इंगवले, माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजीव आवळे, राहुल आवाडे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

अखेर या सर्व नेत्यांना ही निवडणूक बिनविरोध करण्यास यश आले. चारही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष म्हणून अर्चना जानवेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. 11 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार होती. आता निवडणूक आयोगाकडे याबाबतची माहिती कळवली आहे. त्यांच्याकडून तसे निर्देश आल्यास ही निवडणूक बिनविरोध केल्याचे अधिकृत जाहीर होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT