Sangli/Jat News : जत शहरातील पन्नास हजार लोकसंख्येला बिरनाळ तलावातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी फक्त आपल्या लोकप्रियतेसाठी येथे बोटिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुळात जत शहरासह तालुक्यातील जनता पाणी टंचाईला सामोरे जात असते अशावेळी उपाययोजना करण्याखेरीज जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पडळकर ही बोटिंग स्पर्धा घेत आहेत. ज्याला नगरपरिषद, पाटबंधारे विभाग व प्रदूषण महामंडळाची कोणतीही परवानगी, एन.ओ.सी. घेतलेली नाही, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार बैठकीत केला आहे. तसेच सावंत यांनी, पडळकर सत्तेच्या जोरावर शासकीय तलावात खासगी संस्थेकडून स्पर्धा घेण्याचा घाट घालत असल्याचाही दावा केला आहे. यामुळे सध्या जतमधील राजकीय तापमान वाढले असून काँग्रेस-भाजपमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Birnal Lake boating controversy in Jat, involving BJP MLA Gopichand Padalkar and Congress leader Vikramsinh Sawant)
जत शहराला बिरनाळ तलावातून पाणी पुरवठा केला जातो. येथे पडळकर खासगी संस्थेकडून स्पर्धा घेण्याचा घाट घालत असल्याने ते शहरातील पन्नास हजार लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा दावा देखील सावंत यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पडळकरांचा हा डाव आम्ही हाणून पाडू असे म्हणत पडळकरांची दंडूकशाही कधीच खपवून घेणार नाही, यासाठी कायदेशीर लढा देऊ, असाही इशारा सावंत यांनी दिला आहे. यावेळी धनगर समाजाचे नेते महादेव दुधाळ, अशोकराव बन्नेनवर, भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, प्रकाश व्हनमाने, आदी उपस्थित होते.
पडळकरांडून कॅनोइंग व कयाकिंग या खासगी संस्थेच्या माध्यमातून दि. 4 ते 6 जुलै दरम्यान येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये क्रीडा विभागाचा कोणताही संबंध नाही. तरीदेखील स्पर्धेच्या वितरण सोहळ्यासाठी क्रीडा व युवकल्याण आणि अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे येणार आहेत. या विनापरवानगीच्या कार्यक्रमास ते हजर राहण्याची संमती देतातच कशी? असा सवालदेखील सावंत यांनी उपस्थित केला आहे.
पुढे सावंत म्हणाले, कोणतीही खासगी संस्था शासकीय नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असणाऱ्या तलावात बोटिंग स्पर्धा कशी घेऊ शकते. ही स्पर्धा क्रीडा विभागाच्या माध्यमातून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहेत. मात्र, क्रीडा विभागाचा कोणताही अधिकारी या स्पर्धेबाबत बोलत नाही, याची घोषणा भाजपचे डॉ. रवींद्र आरळी करतात, ते काय क्रीडा विभागाचे जावई आहेत का? अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.
जत तालुक्यातील जनतेचे जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अनेक समस्या आहेत. याकडे जतच्या आमदारांचे लक्ष नाही. हे सरकार सत्तेवर येऊन आठ महिने झाले तरी देखील जतच्या जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत. शिवाय, जत तालुक्यातील जनतेचा व बोटिंगचा काडीमात्र संबंध नाही. या स्पर्धेतून आमच्या जनतेच्या जीवनात कोणते परिवर्तन होणार आहे? याचा विचारही भाजपच्या आमदारांनी करायला हवा होता. केवळ लोकप्रियता वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचा ही आरोप सावंत यांनी केला आहे.
तसेच ज्या तालुक्यात पिण्याच्या पाण्याची वणवन आहे, तिथे अशा स्पर्धा भरवणे म्हणजे हास्यास्पद आहे. या ऐवजी मैदानी स्पर्धा भरवली असती तर आम्ही त्याला जाहीर पाठिंबा दिला असता असेही माजी आ. विक्रमसिंह सावंत यांनी म्हटलं आहे.
एखाद्या सरकारी तलावात खाजगी संस्थेला अशा प्रकारे बोटिंग स्पर्धा घेण्यासाठी सरकारने मुकसंमती दिलीय का? नगरपरिषद, पाटबंधारे व प्रदूषण महामंडळाची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे. तसेच जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तर अशी उत्तरे का दिली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात बेकायदेशीर पणे बोटिंग स्पर्धा घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडणारे नगरपरिषदचे मुख्यधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत याबाबत आपण ग्राहक न्यायालयात जाऊ, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते प्रा. हेमंत चौगुले यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.