Vikram Sawant Vilas Jagtap Sarkarnam
पश्चिम महाराष्ट्र

Jat News : राजकीय वैरी आले एकत्र; जतचे आजी-माजी आमदारांचे जुळले !

Jat Politics : तालुक्याच्या प्रश्नासाठी दोघे एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात सकारात्मक चर्चा सुरू आहे.

Rahul Gadkar

Sangli Political News : दुष्काळाच्या यादीत जत तालुक्याचा समावेश करावा, या मागणीसाठी मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी चांगलीच कंबर कसली आहे. दुष्काळाचा सर्वात जास्त फटका सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला बसतो. मात्र, दुष्काळाच्या यादीत जत तालुक्याचे नाव नसल्याने आता लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघातील राजकीय वैऱ्यांची दुष्काळाच्या प्रश्नावरून मने जुळली आहेत. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत आणि भाजपचे माजी आमदार विलास जगताप यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्याच्या प्रश्नासाठी हे दोघे एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात सकारात्मक चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विक्रम सावंत व विलास जगतापांची भूमिका

जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (आज) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत, अशी माहिती आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जत तालुका शंभर टक्के अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील सर्व तलावांमध्ये सद्य:स्थितीत तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २७ तलावांपैकी १० तलाव कोरडे पडलेत. अजून कडक उन्हाळा सुरू झाला नसताना आतापासून दुष्काळच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यात दुष्काळ यादीतून जत तालुक्याला वगळल्यानंतर रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दोघांनीही दिला आहे.

आमदार विक्रम सावंतांचा नागपूरवर निशाणा

जत तालुक्याला दुष्काळी झळा आतापासूनच सोसाव्या लागत असून, मे महिन्यापर्यंत तालुक्याची अवस्था वाईट होईल. तांत्रिक गोंधळ घालून येथील माणसे मारणार आहात का, असा सवाल उपस्थित करत आमदार विक्रम सावंत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच जत तालुक्याचा दुष्काळच्या यादीत समावेश करावा, अशी मागणीही विक्रम सावंत यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी नागपूरच्या एका कंपनीवरही गंभीर आरोप केले होते.

बुधवारी तालुकास्तरावर आढावा बैठक

येत्या दोन दिवसांत राज्यातील दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर होणार असल्याची बातमी कळल्यानंतर जत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी बैठक घेतली. दुष्काळग्रस्ताच्या यादीतून जत तालुक्याला वगळल्यानंतर नागरिकांच्यात तीव्र संताप आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम सावंत यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांची मते जाणून घेतली. या वेळी आरपारची लढाई लढण्याचा इशारा देण्यात आला.

विलास जगतापांचा सरकारला घरचा आहेर

जतच्या वंचित ६५ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याचे जानेवारीत काम सुरू करू, असे आश्वासन होते. मात्र, यावरून विलास जगताप यांनी हे धादांत खोटे असून, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी २०० कोटी रुपये त्यांनी दिले आहेत. ही वस्तुस्थिती आहे; परंतु विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे, असे जगताप म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT