Satej Patil - Rajesh Kshirsagar - chandrakant Jadhav
Satej Patil - Rajesh Kshirsagar - chandrakant Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर 'उत्तर'साठी काँग्रेसचा 'डाव'; भाजपच्या पराभवासाठी सेनेचा उमेदवार उभा करायचा

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North) मतदारसंघासाठी सध्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav) यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तरची जागा रिकामी झाली होती. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून (ता. १७ मार्च) सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत २४ मार्च आहे. मतदान १२ एप्रिल रोजी होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये घडामोडींना वेग आला आहे. भाजपने (BJP) ही निवडणूक लढवण्याची तयारी केली असून काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी प्रदिर्घ चर्चा केली. त्यानंतर आज फडणवीस इच्छुकांची यादी घेवून दिल्लीत जाणार असून तिथूनच उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने देखील ही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने या जागेवरुन दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना रिंगणात उतरवण्याचे निश्चित केले आहे. मात्र त्याचवेळी भाजपने ही जागा लढवण्याची केलेली तयारी पाहून आणि यापूर्वीच्या पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचा विजयाचा इतिहास लक्षात घेत ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने उत्तरेत जोरदार फिल्डिंग लावली आहे.

आघाडी धर्मानुसार सध्या ही जागा काँग्रेसकडे जाणार आहे. मात्र १९९० पासून २००४ आणि २०१९ चा अपवाद वगळता या जागेवर शिवसेनेचा भगवा होता. तसेच सलग दोनवेळा या जागेवर प्रतिनिधित्व केल्याचा आणि शिवसेनेचा दावा करून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही जागा शिवसेनेला मिळावी, असा आग्रह धरला आहे. तसेच अलीकडेच राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेची मते काँग्रेसला जात नाहीत, असे जाहीर वक्तव्य केले आहे. याशिवाय जाधव हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. त्यांच्या कुटुंबातील दोन नगरसेवक भाजपचे होते. त्यामुळे चंद्रकांत जाधव यांच्यानंतर त्यांना मिळालेली मत पुन्हा भाजपकडे वळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून याच सर्व इतिहासाचा आणि समीकरणांचा गांभीर्याने विचार सुरु असल्याचे समजत आहे. शिवसेनेचा उमेदवार रिंगणात नसेल तर कट्टर शिवसैनिक मतदानाला जाणार नाही किंवा मतदानाला गेलाच तर तो आघाडी म्हणून काँग्रेसलाच मतदान करेल, याची शाश्‍वती नाही. तो नोटाला किंवा भाजपला मतदान करु शकतो. त्यातूनच मग ही जागा आघाडीकडेच राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असावा, असा सूर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांकडून काढला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. यामागे हिंदुत्ववादी मतांत विभागाणी व्हावी, हे कारण आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कळीचा मुद्दा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT