पलूस, कडेगाव, जत आणि मिरज तालुक्यांत काँग्रेसची स्थिती तुलनेने मजबूत आहे.
शिराळा, वाळवा, खानापूरसह सहा तालुक्यांत काँग्रेसची अवस्था बिकट आहे.
या कमकुवत तालुक्यांत काँग्रेस लढत उभी करणार की साटंलोट्याचा मार्ग स्वीकारणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
Sangli News : पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या चार तालुक्यांत काँग्रेसची स्थिती चांगली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्थानिक पातळीवर काही आघाड्या करून काँग्रेस डाव मांडायला लागले आहे. परंतु शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या सहा तालुक्यांत काँग्रेसची अवस्था फार बिकट आहे. काही मोजक्या जागांवर काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. मात्र, काँग्रेस नेते तेथे बळ देऊन लढत उभी करणार की, ‘साटंलोटं’ व्यवहारात या सहा तालुक्यांकडे दुर्लक्ष केले जाणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पलूस आणि कडेगाव तालुक्यात आमदार विश्वजित कदम यांची पकड मजबूत आहे. जतमध्ये माजी आमदार विक्रम सावंत यांनी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. मिरज तालुक्यात खासदार विशाल पाटील यांचा मिरज पूर्व आणि पश्चिम भागात प्रभाव आहे. तिथे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची त्यांना साथ मिळते आहे. या चार तालुक्यांतील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या २९ आहे. काँग्रेसने संपूर्ण ताकद या चार तालुक्यांवर लावायचे ठरवले आहे, त्यादृष्टीने उमेदवार निश्चिती शेवटच्या टप्प्यात आली आहे.
वाळवा तालुक्यात ११, आटपाडी तालुक्यात ४, कवठेमहांकाळ तालुक्यात ४, खानापूर तालुक्यात ३, तासगाव तालुक्यात ६, शिराळ्यात ४ जिल्हा परिषद गट आहेत. या ठिकाणी काँग्रेसची ताकद तोळामासा राहिली आहे. वाळव्यात जितेंद्र पाटील यांच्यासारखे काही ताकदीने शिलेदार उभे आहेत. ईश्वरपूर नगरपालिकेला काँग्रेसकडून अनेक इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादीला बाय दिला होता. परिणामी, काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले. ते जिल्हा परिषदेलाही होणार का, अशी चिंता होतीच. आता नव्या आघाडीत काय धोरण राबवले जाते, याकडे लक्ष लागले आहे.
तासगाव तालुक्यातील येळावी गटातून अमित पाटील इच्छुक असले, तरी त्यांना मुलाखत मात्र आमदार रोहित पाटील यांच्याकडे द्यावी लागली होती, हे विशेष. शिराळा तालुक्यात सत्यजीत देशमुख यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तिथे नवीन ताकदीचे नेतृत्व घडले नाही. खानापुरात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तिथेही पक्षाला फार वाव राहिला नाही, कदम कुटुंबाला तिथे वाव आहे, जितेश कदम यांच्या नेतृत्वाला हाक दिली जात आहे. मात्र, त्या ताकदीने अद्याप तिथे मांडणी झालेली दिसत नाही. कमी अधिक फरकाने आटपाडी तालुक्यात तीच स्थिती आहे.
कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यात सातत्याने काँग्रेसने दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यासाठी रान मोकळे सोडले. तिथे राष्ट्रवादीच्या सावलीत काँग्रेसची वाढ खुंटलीच. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर प्रभावी नेतृत्वच उरले नाही. खासदार विशाल पाटील यांचा प्रभाव असलेले, वसंतदादा कारखान्याचे हे कार्यक्षेत्र असूनदेखील काँग्रेसला इथे बळ मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
निवडणूक तोंडावर असल्याने भाजपला विरोध करावा आणि अधिकाधिक विरोधी उमेदवार निवडून आणावेत, हे काँग्रेसचे धोरण दिसते आहे. परंतु, त्यात काँग्रेसच्या लढाऊ कार्यकर्त्यांना पुन्हा मागे राहावे लागणार का, अशी चर्चाही रंगलेली आहे. नव्याने मांडणी कधी?
आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर माध्यमांनी सहा तालुक्यातील काँग्रेसच्या स्थितीवर प्रश्न विचारला होता. त्या ठिकाणी पुन्हा पक्ष वाढीचे धोरण काय, यावर विचारले होते. आघाडीच्या राजकारणात थोडे दुर्लक्ष झाले, अशी कबुली त्यांनी दिली होती. त्या निवडणुकीला दीड वर्षे उलटले, या काळात तिथे नव्याने मांडणी, बांधणीसाठी काय झाले, याची उत्तरे या नेत्यांनी देणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढायचा आता बरीच वर्षे खंड असणार आहे.
1) कोणत्या तालुक्यांत काँग्रेस मजबूत आहे?
पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या तालुक्यांत काँग्रेसची स्थिती चांगली आहे.
2) कोणत्या तालुक्यांत काँग्रेस कमकुवत आहे?
शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांत काँग्रेसची अवस्था बिकट आहे.
3) काँग्रेस कोणती रणनीती वापरत आहे?
काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाड्या करून काँग्रेस डाव मांडत आहे.
4) कमकुवत तालुक्यांत काँग्रेस काय करणार?
तेथे बळ देऊन लढत उभी करणार की साटंलोट्याचा मार्ग स्वीकारणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
5) या निर्णयाचा परिणाम कुणावर होणार?
या निर्णयाचा परिणाम थेट काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आणि निवडणूक निकालांवर होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.