Gangadharpant Kuchan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress Former MP : काँग्रेसचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कुटुंबाचा देहदानाचा निर्णय

Solapur News : सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी देहदानाचा निर्णय घेतला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 May : सोलापूरचे काँग्रेसचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन (वय ९१) यांचे आज (ता. १२ मे) पहाटे पाचच्या सुमारास हृदयविकराच्या झटक्याने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कुचन कुटुंबीयांनी त्यांचा देहदान करण्याच्या निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून गंगाधरपंत कुचन यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख होती. ते सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर 1980 आणि 1985 या दोन निवडणुकांमध्ये विजयी झाले होते.

लोकसभेच्या 1990 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कुचन यांच्याऐवजी धर्माण्णा सादूल यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतरही ते वर्षभर काँग्रेस पक्षात होते. पण, १९९१ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तत्कालीन उमेदवार लिंगराज वल्याळ यांच्या विजयासाठी माजी खासदार कुचन यांनी विशेष योगदान दिलं होतं. त्यानंतर 1995 च्या सुमारास कुचन यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कुचन यांनी भरीव योगदान दिलं होते. सोलापूरच्या पूर्व भागातील नागरी बँका, पतसंस्था, सूतगिरण्या उभारणीमध्ये गंगाधरपंत कुचन यांचा सक्रिय सहभाग होता. सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालय आणि सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालय आदींच्या उभारणीत कुचन यांनी मोठे योगदान दिले आहे.

औद्योगिक बँकेच्या माध्यमातून कुचन हे अनेक वर्ष राज्य सहकारी बँकेवर संचालक होते. सोलापुरातील हैदराबाद रस्त्यावरील पहिलं विड घरकुल उभारणीच्या कामाची मुहूर्तमेढ माजी खासदार कुचन यांनी रोवली. गेल्या १५ वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून लांब होते. मात्र, सहकारी संस्थांच्या बैठकांना ते उपस्थित राहून मार्गदर्शन करत असे.

गंगाधरपंत कुचन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. अश्विनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. गंगाधरपंत कुचन पश्चात तीन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT