Balasaheb Patil, Shambhuraj Desai
Balasaheb Patil, Shambhuraj Desai  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा बॅंकेसाठी हमरीतुमरी... तरी पालकमंत्री आणि शंभूराज यांचे बोलणे नाही...

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाटण सोसायटीतून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना सामावून घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना करूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेवटी सत्यजितसिंह पाटणकरांनाच रिंगणात उतरवले आहे. पण, याची सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोणतीच कल्पना नव्हती. याविषयी भूमिका मांडताना बाळासाहेब देसाई म्हणाले, शंभूराज देसाई यांना सहकार पॅनेलमध्ये घेतले जाणार होते किंवा नाही, याची मला काहीही माहिती नाही. त्यांचे वरिष्ठ पातळीवरून काय झाले, हेही मला माहित नाही. गेली १५ दिवस माझे मंत्री देसाईंशी काही बोलणे झालेले नाही, असे सांगत त्यांनी गुगली टाकली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला बाजूला ठेवत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन अकरा जागा बिनविरोध केल्या. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या भूमिकेविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीत पहायला मिळणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यानंतर महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील दुसरे मंत्री शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांना यावेळेस जिल्हा बँकेत सामावून घेण्याबाबतची चर्चा झाली होती. मागील वेळी त्यांना शब्द देऊनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सामावून घेतले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना जिल्हा बँकेत संधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी सूचना सभापती रामराजे व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना केली होती.

पण, चर्चेच्या फेऱ्यात पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर यांच्या ऐवजी त्यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमधून उमेदवारी दिली गेली. उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळेस निश्चित संधी मिळेल या आशेवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण सोसायटीतून अर्ज भरला आहे. आता या मतदारसंघातून सत्यजितसिंह पाटणकर विरूध्द गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई अशी लढत होत आहे. यामध्ये शंभूराज देसाई यांना कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. त्यामुळे पाटणची लढत लक्षवेधी आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पाटणकर व मंत्री देसाई यांच्या उमेदवारीवरून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या.त्यातून शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांना राष्ट्रवादीने पॅनेलमध्ये घेतले. याविषयी मात्र, सहकार मंत्री तथा पालकमंत्री यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमध्ये घेतले जाणार होते. याविषयी विचारले असता मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ''त्यांना पॅनेलमध्ये घेतले जाणार होते किंवा नाही, याची मला काहीही माहिती नाही. मी जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेत आहे. मात्र, त्यांचे वरिष्ठ पातळीवर काय झाले, मला माहिती नाही. माझेही १५ दिवस मंत्री देसाईंशी काही बोलणे झालेले नाही. ज्यांनी आमच्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली, ज्यांची अपेक्षा आहे, त्यांना बरोबर घेऊन चर्चा केली. चर्चा करण्यासाठी आमच्या नेतेमंडळींकडे कोणी आले, त्यांचा विचार केला गेला.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT