Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

koregaon : कोरेगावातील भ्रष्‍टाचाराची लवकरच पोलखोल... शशिकांत शिंदे

राजेंद्र वाघ

पळशी : महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचारासंदर्भात विद्यमान आमदारांची मी पोलखोल केली, हे त्यांच्या जिव्हारी लागल्यानेच ते खोटं बोलत आहेत. मुंबई बाजार समिती संदर्भात माझ्यावर आरोप करण्यामागे विद्यमान आमदारांचे षडयंत्र असून, ते मी लवकरच बाहेर काढणार आहे. आरोप करताना पुरावे देऊन बोलत चला. अन्यथा, आम्ही कोरेगाव नगरपंचायतीच्या विविध कामांमध्ये पार्टनर कोण आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना कोणी वेठीस धरले, अशा आपल्या अनेक कृत्यांची पोलखोल करू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून दिला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी ते बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "खोटं बोल, पण रेटून बोल, ही विद्यमान आमदारांची सवय आहे. त्यांनी कोरेगाव देवस्थानसंदर्भात बैठक घेतली; परंतू तो विषय राहिला लांबच. त्यांनी तिथेच माझ्यावर टीका केली. त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांची चौकशी त्यांच्याच सरकारच्या काळात व्हावी, हे माझे आव्हान आहे. हायवेच्या कामातील भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी व्हावी आणि त्यात सामील असणाऱ्यांवर कारवाई करावी, ही माझी मागणी आहे.

लोकांना वेठीस धरून पैसे उकळण्याचा प्रकार विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत. कोरेगाव नगरपंचायतीच्या कामांमध्ये मी कधीही हस्तक्षेप केला नाही. मात्र, आता नगरपंचायतीमध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून निवडणुकीसाठी पैसे घेऊन कॉन्ट्रॅक्टरला सर्व कामे देण्यात आली, त्यामध्ये पार्टनर कोण आहे? ॲडव्हान्समध्ये पैसे घेऊन निवडणूक लढवली आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरला कामे दिली, हे सगळ्या नगरसेवकांना माहित आहे. असे अनेक प्रकार कोरेगाव मतदारसंघात सुरू आहेत. सत्तेचा उन्माद वाढला आहे, लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटायला लागला आहे आणि त्याचा लवकरच उद्रेक होईल.

कोरोनाच्या काळात विद्यमान आमदारांनी फार मोठे काम केल्याचे दाखवले जाते. त्या काळात चांगलं काम केलं असेल, तर त्यांचं कौतुक आहे; परंतु त्यातून कोण धंदा करत असेल, रूग्णांना वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तेही लोकांना कळलं पाहिजे. किती रुग्ण बरे झाले, किती मृत झाले, त्याची जबाबदारी कोण घेणार? रेमिडीसीवरचा कोठे वापर झाला? सरकारकडून किती अनुदान आले? रेमिडीसीवर रुग्णांना दिले की विकले गेले? ते कोणत्या दुकानातून विकले गेले? एवढेच नव्हे, तर रुग्णांना पंढरपूरला का नेले? त्यातील किती रुग्ण बरे होऊन आले, किती चार्ज लावला गेला? दुसरीकडे हॉस्पिटल नव्हते का? याचाही खुलासा करावा लागेल.

लोकांना फसवून प्रवेश

विद्यमान आमदारांकडील बरीच मंडळी माझ्या संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे नमूद करून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "विद्यमान आमदारांच्या गटात लोकांनी प्रवेश केल्याचे दाखवले जाते. खरं म्हटलं, तर त्यांचे काही कार्यकर्ते लोकांना फसवून नेत असतात, कामानिमित्त सर्वसामान्य लोक लोकप्रतिनिधींकडे जात असतात. त्यांचा लगेच प्रवेश केल्याची बातमी पसरवली जाते. गोगावलेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ पाण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यांनी प्रवेश केला म्हणून दाखवले गेले. खोटं फार काळ चालत नाही. गोगावलेवाडीच्या संबंधित लोकांनी माझी भेट घेत स्पष्ट सांगितले की, 'आम्ही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो होतो; परंतु आमचा प्रवेश दाखवला गेला.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT