सातारा : खेड ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणी शिंदे गट शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या असून त्यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशीकांत शिंदे, मकरंद पाटील व भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाच्या पॅनेलला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे गटाकडे दुसरी मोठी ग्रामपंचायत आली आहे. तीन आमदारांना एकटे कोरेगावचे आमदार महेश शिंदे भारी पडले आहेत.
खेड ग्रामपंचायतीत आमदार महेश शिंदे गटाचे सरपंच पदासह पॅनेलने वर्चस्व मिळवले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे, मकरंद पाटील तसेच भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या स्थानिक गटाचे खेड ग्रामविकास पॅनेल विरूध्द कोरेगावचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांच्या स्थानिक गटाचे खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेल असा चुरशीचा सामना रंगला होता.
यामध्ये खासदार उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांच्या स्थानिक गटाच्या पॅनेलने वर्चस्व मिळवत सरपंच पदासह १२ जागा जिंकल्या आहेत. तर आमदार शशीकांत शिंदे, मकरंद पाटील व भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या स्थानिक गटाच्या पॅनेलला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे.
या निवडणुकीत आमदार शशीकांत शिंदे व मकरंद पाटील यांनी स्वतः लक्ष घातले होते. त्यांनी आपल्या पॅनेलसाठी स्वतः सभा, बैठका घेत प्रचार फेऱ्या काढल्या होत्या. तसेच महेश शिंदेंही स्वतः प्रचारात सहभागी झाले होते. खेडला नगरपंचायत करण्याचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरला. या विजयानंतर खेडमधील आमदार महेश शिंदे गटाच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत पोवईनाक्यावर गुलालाची उधळण केली.
विजयी उमेदवार असे : आमदार महेश शिंदे गटाच्या खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेल ः विनोद माने, सुलभा लोखंडे, संतोष शिंदे, सुधीर काकडे, स्मिता शिंदे, सुमन गंगणे, शरद शेलार, वंदना गायकवाड, शामराव कोळपे, प्रियांका संकपाळ, चंद्रभागा माने. सरपंच पदाच्या लता अशोक फरांदे यांनी बाजी मारली आहे. तर विरोधी खेड ग्रामविकास पॅनेलचे कांतीलल कांबळे, सुशीला कांबळे, निखिल यादव यांच्यासह पाच उमेदवार विजयी झाले आहेत.
विरोधी पॅनेलसोबत एक खासदार व तीन आमदारांची ताकद असूनही आमच्या पॅनेलला खेड ग्रामपंचायतीत जनतेने निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले आहे. कारण आमच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार महेश शिंदे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.