Solapur, 02 July : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून तो आठवडाभरात आमच्यासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश कोल्हापूर सर्किट बेंचने दिल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा डाव उधळला आहे. प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून बॅंकेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या निर्णयामुळे फसला आहे. बॅंकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आमदार राजेंद्र राऊत यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर तीन सदस्यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याबाबत विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या.
प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीबाबत विभागीय निबंधक कार्यालयाने सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अहवाल मागितला होता. तो अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने विभागीय कार्यालयास नुकताच सादर केला आहे, त्यामुळे प्रशासकीय मंडळाच्या नेमणुकीबाबत हालचालींना वेग आला होता. सहकार विभागात मंत्रालय पातळीवरही घडामोडींना सुरूवात झाल्याची माहिती आहे. मात्र, त्या सध्या थंडवण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळासाठी आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार राजन पाटील या तिघांची भाजपकडून, तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय शिंदे ही नावे चर्चेत होती. मात्र, त्यापूर्वीच कोल्हापूर सर्किट बेंचने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या प्रशासकास पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्णयामुळे भाजपच्या नेत्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न फसल्याचे मानले जात आहे. न्यायालयाच्या भूमिकेमुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक लागल्यास भाजपचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, थेट प्रशासकीय मंडळाचा काही नेत्यांनी जो घाट घातला होता, त्यास तूर्तास ब्रेक लागल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.