Samadhan Avtade
Samadhan Avtade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

समाधान आवताडेंनी इच्छुकांना ठेवले गॅसवर; ‘सभासदांची पसंती असेल तरच उमेदवारी’

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Sugar Factory Election) मी कोणताही उमेदवार लादणार नाही. सभासदांच्या पसंतीचा उमेदवार दिला जाणार आहे, त्यामुळे अगोदार सभासदांचे मत जाणून घ्या; मगच उमेदवारीबाबत ठरवू, अशी सूचना आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी अर्ज भरेलल्या इच्छुकांना केली. त्यामुळे आवताडे यांनी इच्छूकांना पुन्हा गॅसवर ठेवले आहे. (Damaji Factory: Candidates will be nominated preference of the members: Samadhan Avtade)

दामाजी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मरवडे, आंधळगाव, भोसे, ब्रह्मपुरी या ऊस उत्पादक गटाबरोबर महिला, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय व संस्था मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवाराचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी सूतगिरणीवर गटनिहाय बैठका घेतल्या. त्यावेळी त्यांनी उमेदवारीबाबतचे निकषाबाबत चर्चा केली.

उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आणखी मुदत आहे, त्यामुळे इच्छुकांनी ऊस उत्पादक सभासदांमध्ये जाऊन त्यांचे मत जाणून घ्यावे. पाच वर्षात एकही हंगाम खंड न ठेवता कारखाना चालवला. यापुढेही कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी चांगल्या नेतृत्वाला संधी देण्याची आवश्यकता आहे. मंगळवेढा तालुक्यातील जनतेने आपल्याला भरपूर दिले आहे, त्यामुळे यापुढेही तालुक्यासाठी काम करत राहणार आहे, असे आवताडे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी अनियंत्रित कारभार करून साखर कारखाना कर्जबाजारी करून ठेवला आपल्या काळात कारखान्यात नोकरी लावण्यासाठी वशिला, ऊस गाळपास लवकर नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे राजकारण केले नाही. ही भूमिका सभासदांसमोर मांडून त्यांचे उमेदवाराबाबत काय मत आहे, हेदेखील जाणून घेण्याची सूचना आमदार आवताडे यांनी दिल्या. सभासदातून दिल्या जाणाऱ्या पसंतीनेच उमेदवार देणार असून उपरा आणि जबरदस्तीने उमेदवार लादणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या सभासदांची मते जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवार कोण, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

या वेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशीकांत चव्हाण, माजी सभापती प्रदीप खांडेकर, येताळा भगत, राजेंद्र पाटील, पप्पू काकेकर, विजय माने, निला आटकळे, सुरेश भाकरे, सुधाकर मासाळ, दत्तात्रय साबणे, रामचंद्र माळी, भारत निकम आदींसह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT