Satara Politics : अखेर रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, काँग्रेसचे माजी नेते ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कराडमध्ये पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधानसभेची निवडणूक संपताच मकरंद पाटील आणि नितीन पाटील या बंधूंनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यातूनच कराड आणि पाटण तालुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी उदयसिंह उंडाळकर यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली होती. अखेरीस दोन महिन्यांपूर्वी उंडाळकरांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. पण त्यांचा पक्षप्रवेश नेमका कधी होणार? हा सस्पेन्स कायम होता.
ॲड. उदयसिंह उंडाळकर यांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यासाठी पाटील बंधूंनी पुढाकार घेतला होता. महिन्याभरापूर्वी स्वत: अजित पवार यांनी याची कबुली दिली होती. या पुढाकारातून हे दोघेही विलासकाका उंडाळकर यांच्या ऋणातून उतराई झाले आहेत. तब्बल 4 दशकांपासून हे ऋण पाटील बंधूंच्या डोक्यावर होते.
मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मणतात्या आणि उदयसिंह उंडाळकर यांचे वडील विलासकाका हे दोघेही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अणि दिवंगत नेते किसन वीर आबांचे अनुयायी होते. लक्ष्मणराव पाटील हे सुरुवातीला नोकरीला होते. पण बंधूंचे निधन झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली आणि गावी आले. राजकारणात उडी घेतली. 1960 मध्ये ते बोपेगावचे सरपंच झाले. ते अगदी 1972 पर्यंत ते सरपंच होते. त्यानंतर वाई पंचायत समितीचे सदस्य झाले. वाई तालुका खरेदी विक्री संघाचेही ते चेअरमन राहिले.
याच दरम्यान, विलासकाका जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले. 1962 मध्ये ते जिल्हा बँकेचे संचालक झाले. त्यानंतर सलग 50 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते. पाठोपाठ लक्ष्मणराव पाटील जिल्हा बँकेचे संचालक झाले आणि इथेच दोघांमध्ये गट्टी जमली. जिल्हा बँकेवर असतानाच विलासकाका जिल्हा परिषद सदस्य झाले.
1980 मध्ये विलासकाकांनी यशवंतराव मोहिते यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. यात मोहिते विजयी झाले. त्यानंतर विलासकाकांनी कराड दक्षिणेतून विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. सोबतच विलासकाका सहकारी संस्थांमध्येही सक्रिय झाले. इथेही काका आणि तात्यांच्या गाठीभेटी होत राहिल्या.
1980 मध्ये लक्ष्मणराव पाटील जिल्हा परिषदेवर निवडून गेले, त्यानंतर त्यांनीही सलग 11 वर्ष जिल्हा परिषदेचा गाडा हाकला. या दरम्यान, विलासकाका उंडाळकर यांनी बँकेतील त्यांच्या सहकारी संचालकांच्या सहकार्याने लक्ष्मण पाटील यांना बँकेचे अध्यक्ष केले. पुढे तात्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले आणि 1999 मध्ये साताऱ्याचे खासदारही झाले. तर काका कॉंग्रेसमध्येच राहिले.
विलासकाकांच्या विरोधात कराड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कधी फार मोठा संघर्ष केला नाही. विलासकाकांनीही कराड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला विजयी करण्यासाठी मदत केली. एका लोकसभेच्या निवडणुकीत विलासकाकांनी तात्यांना निवडून आणण्यासाठी सातारा जिल्ह्यातील स्वतःचा गट वापरुन मदत केली. त्यामुळे काका-तात्या हा मैत्रीचा धागा कायम राहिला.
लक्ष्मणतात्या आणि विलासकाका या दोघांच्या पश्चात तात्यांच्या दोन्ही मुलांनी राजकीय ताकद वाढवली. मकरंद पाटील आमदार, मंत्री झाले, नितीन पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष, खासदार झाले. पण विलासराव पाटील यांच्या वारसांना ते जमले नाही. उदयसिंह उंडाळकर हे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे सदस्य, कारखान्याच्या अध्यक्ष इथपर्यंतच मर्यादित राहिले.
पण आता तात्या-काकांच्या जुन्या मैत्री धाग्यातून मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी उदयसिंह पाटील यांना राष्ट्रवादीची गळ घातली. हा प्रस्ताव देत त्यांनी वडिलांवर असलेल्या तब्बल 4 दशकं जुन्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि उदयसिंह उंडाळकर यांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.