Solapur, 13 October : शिवसेनेचे मंगेश चिवटे यांना उमेदवारी न मिळाल्याने एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य करताना ‘महायुती म्हणून आमचा समन्वय राहील आणि त्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होईल. त्यातून मार्ग निघेल आणि असा कोणताही बहिष्कार राहणार नाही,’ असे म्हटले आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (ता. १३ ऑक्टोबर) सोलापुरात बैठक झाली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आज बैठक झाली. निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ आणि मंडल अधिकाऱ्यांवर जबाबदारी देऊन पहिल्या टप्प्यातील काय तयारी केली पाहिजे, या संदर्भात चर्चा झाली..
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने मंगेश चिवटे यांना उमेदवारी न मिळाल्याने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे, त्यावर गोरे म्हणाले, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतला आणि तो निर्णय कोणी जाहीर केला आहे. त्या दहा हजार शिक्षकांनी काय लिहून दिलं आहे का? याचा विचार करावा लागेल. पण, असं काही घडणार नाही.
महायुती म्हणून आमचा समन्वय राहील आणि त्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होईल. असा कोणताही बहिष्कार राहणार नाही, त्यातून मार्ग निघेल, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
पुणे पदवीधर मतदारसंघ मोठा आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांत तो विस्तारलेला आहे. या जिल्ह्यांचे भाजप उमेदवारांचे दौरे ठरले आहेत. येत्या 16 आणि 18 ऑक्टोबरला भाजपचे उमेदवार सोलापूर जिल्ह्यात येतील, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री गोरे म्हणाले, उजनी धरण पर्यटन प्रस्ताव मंजूर झाला आहे. काम करण्यासंदर्भात जलसंधारण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर उजनी पर्यटन कामाला सुरुवात होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.