Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सोलापूर जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक साळुंखे यांची, तर कार्याध्यक्षपदी लतीफ तांबोळी यांची निवड अंतिम झाली आहे. त्याबाबतची घोषणा मात्र अजून झालेली नाही. अजित पवार गटाकडून सोलापूरचे शिलेदार नेमण्याची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. या दोन्ही नावांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. स्वतः पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. (Deepak Salunkhe as Solapur district president of NCP (Ajit Pawar group) is confirmed)
अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. या गटाकडून प्रदेशाध्यक्षपदापासून अनेक जिल्ह्यांत नवे अध्यक्ष नेमले होते. पण, नव्या अध्यक्षांबाबत सोलापुरात उत्सुकता होती. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख कल्याणराव काळे, माजी आमदार साळुंखे आणि प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची नावे चर्चेत होती.
साळुंखे आणि तांबोळी यांची निवड करत आगामी निवडणुकांचा हंगाम लक्षात घेऊन जातीय समीकरणे साधण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते. तांबोळी यांच्या माध्यमातून सोलापूर लोकसभेतील व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेतील चेहरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुढे केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील जवळीक लक्षात घेता पाटील हे जिल्हाध्यक्ष होतील, असा दावा त्यांचे समर्थक करत होते. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यावर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील राजकीय द्वंद्व कोणते वळण घेणार याची चर्चा रंगली होती. मात्र, जिल्हाध्यक्षपदात न अडकता राजन पाटील यांच्या विरोधात २०२४ च्या निवडणुकीत समविचारींसोबत जाण्यासाठी उमेश पाटील हे मोकळे राहिल्याचे दिसून येत आहे.
माजी आमदार रमेश कदम हे २४ सप्टेंबर रोजी मोहोळच्या दौऱ्यावर येत आहेत. ‘रमेश-उमेश’ची जोडी आगामी निवडणुकीत चमत्कार दाखवू शकते, अशी चर्चा रंगली आहे. अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यास पक्षाची शिस्त आणि निर्णय पाळणे उमेश पाटील यांच्यासाठी बंधनकारक राहिले असते, त्यामुळे पाटील यांनीच ही खेळी खेळल्याची चर्चा मोहोळमध्ये सुरू आहे.
सोलापूरच्या ग्रामीण भागात अजित पवार यांची राष्ट्रवादी ताकदवान आहे. मात्र, शहरात मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मोठे पुढारी पक्षात आहेत. त्यातही शहराध्यक्षपदासाठी संतोष पवार, जुबेर बागवान व किसन जाधव यांची नावे चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे ऐकून घेतले. मात्र, शहराचा नंबर येईपर्यंत उपमुख्यमंत्री पवार यांची राजभवनात जाण्याची वेळ झाली. त्यामुळे शहराचा विषय पुन्हा एकदा लटकला आहे. पूर्वी एकसंध असतानाही राष्ट्रवादीत शहराला फारशी महत्त्वाची वागणूक नव्हती, आताही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तोच अनुभव येताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.