Ransom case
Ransom case  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाजार समितीच्या संचालकांकडे दहा लाखांची खंडणी मागत मुलाला जबर मारहाण

Vijaykumar Dudhale

सांगली : सांगली बाजार समितीचे संचालक बाळू बंडगर यांच्याकडे टोळक्याने दहा लाखाची खंडणी (ransom) मागत त्यांचा मुलाला काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (ता. ४ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. (Demand for ransom from Balu Bandagar, Director, Sangli Market Committee)

टोळक्याने बाजार समिती कार्यालयातही धिंगाणा घातला. त्यामुळे मार्केट यार्डात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विश्रामबाग पोलिसांत नोंद झाली आहे. संचालक बंडगर यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित सतिश फोंडे, सागर पारेकर, नवनाथ लवटे, दत्ता फोंडे, अक्षय चोपडे, युवराज बजबळे या सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बंडगर यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ते बाजार समितीच्या कार्यालयात संचालक अजित बनसोडे, कर्मचारी देवेंद्र करे, प्रशांत कदम यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. संशयित सतीश फोंडे त्यांचाच कार्यकर्ता आहे. तो इतर साथीदारांसह बाजार समितीत आला. सागर पारेकरने बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीला उभारणार असला तर दहा लाख रुपये द्या, अशी मागणी केली. पैसे दिले नाही तर निवडणुकीला उभे रहायचे नाही; अन्यथा मुलाला ठार मारीन, अशी धमकी देऊन निघून गेले.

दरम्यान, बंडगर यांचा मुलगा संदीप हरीष ट्रेडर्समध्ये हमाली करतो. सर्व संशयित तिथे गेले. त्यांनी संदीपला लाथाबुक्क्या, काठीने मारहाण केली. सागर जवळील हत्यार काढत असताना संदीप हा टोळक्यांच्या तावडीतून सुटून बाजार समितीत पळून आला. नंतर सर्व संशयित बाजार समितीत आले. त्यांनी कार्यालयाबाहेर धुडगुस घालत दगडफेक केली. आवारातील कुंड्या फोडून नासधूस करीत दहशत निर्माण केल्याचे म्हटले आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संशयितांना अद्याप अटक करण्यात आली नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT