Ajit Pawar and Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Kolhapur Sabha : शरद पवारांनंतर आता कोल्हापुरातही अजितदादांची सभा; उत्तर देणार की...

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवारांनी थेट मैदानात उतरत येवला, बीड, कोल्हापूरमध्ये सभा घेतल्या. त्यानंतर अजित पवार यांच्या गटानेही बीडमध्ये सभा घेतली. आता कोल्हापूरमध्ये देखील अजितदादांची १० सप्टेंबरला 'उत्तरदायित्व' सभा होणार आहे. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवारांचा भव्य सत्कार देखील या सभेदरम्यान करण्यात येणार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून या सभेत अजित पवारांसह हसन मुश्रीफ काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) तपोवन मैदानावर सायंकाळी चार वाजता ही सभा पार पडणार आहे. या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त लोकांची उपस्थित असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी दिली आहे.

या सभेबाबतचे पत्रक देखील जारी करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे निकाली काढण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे योगदान आहे. भविष्यात देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे योगदान मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वी आमचे दैवत व नेते शरद पवारसाहेबांची कोल्हापुरात सभा झाली. त्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नाही. तर नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनासाठी अजित पवार कोल्हापुरात आले होते. मात्र, आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो नव्हतो. त्यामुळे ही सभा असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

या सभेला खासदार प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, रूपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे अजित पवार या सभेतून उत्तर देणार की विकासावर बोलणार ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT