Devendra Fadnavis, Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil
Devendra Fadnavis, Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics: राम शिंदे-विखे पाटील वादावर फडणवीस थेटच बोलले; म्हणाले, वाद असले तरी...

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar BJP: गेल्या काही दिवसांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात वाद सुरु आहे. राम शिंदे यांनी नगर दक्षिणमधून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

तेव्हापासून शिंदे-विखे यांच्यात दरी वाढल्याची चर्चा आहे. त्यातच जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदेंनी विखेंवर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून नगर भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.

अशातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीस काय मार्ग काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवरच राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी थेटपणे बोलले आहेत.

राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वादाबद्दल पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, "म्हणून तर दोघांना सोबत घेऊन बसलो ना. समन्वय आहेच. काही काळजी करु नका. काही वाद नाहीत. वाद असले तरी वादळ नाही. चिंता करु नका. चहाच्या पेल्यातील वादळ आता संपलेलं आहे", अशी सूचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

राम शिंदे-विखे पाटलांमधील वाद काय?

जामखेड बाजार समिती सभापतीपदाच्या निवडीदरम्यान घडलेल्या घडामोडींवरून राम शिंदे आणि विखे पाटलांमध्ये वादाची ठिणगी पडली. जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप शिंदेंनी केला होता.

त्यांच्या आरोपानंतर विखे पाटलांनीही त्यांना प्रतिउत्तर देत निशाणा साधला होता. त्यानंतर "या सर्व गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या जातील", असं शिंदे म्हणाले होते. तर "आम्ही देखील पक्षश्रेष्ठींशी बोलू", असं विखे म्हणाले होते.

दरम्यान, राम शिंदे यांनी केलेल्या आरोपामुळे नगरमधील भाजपच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, आता यावर देवेंद्र फडणवीस यांनीच "चहाच्या पेल्यातील वादळ आता संपलेलं आहे", अशी सूचक प्रतिक्रिया दिल्याने राम शिंदे आणि विखे पाटलांमधील वादावर सध्या तरी पडदा पडला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT