Satara, 15 February : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. भाजपला वगळून राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपला अध्यक्ष बसविण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर भाजपने अध्यक्षपदासाठी शड्डू ठोकला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होणार, त्यासाठी सगळे प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही ‘कार्यकर्त्यांनो, काळजी करू नका. देवेंद्र है तो सब मुमकीन है...’ असे सांगून भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी चाललेल्या सत्तास्पर्धेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार साताऱ्यात करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत (Satara Zilla Parishad) भाजपचा अध्यक्ष बसविण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष साताऱ्याकडे लागले आहे.
शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेचे गट आणि गणांमधील भाजपचे काही उमेदवार हे विजयाच्या जवळ आले होते. मात्र, त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतरही भाजप २७ जागांपर्यंत पोचला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करत आहोत. कार्यकर्त्यांनो, काळजी करू नका. देवेंद्र है तो सब मुमकीन है... असे सांगत त्यांनीही साताऱ्यात भाजपचाच अध्यक्ष होणार, असे सूतोवाच केले.
सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सदस्यसंख्या ‘०७’वरून २७ पर्यंत वाढला आहे. भाजप हा स्वातंत्र्यानंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तीन पंचायत समित्यांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे आगामी काळात संघटन बळकट करून भाजपला गावागावांत पोचविण्याचे काम केले जाईल, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले.
गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा संकल्प आम्ही केला होता. पण, भाजपची जेवढी ताकद आहे, तेवढे यश सातारा जिल्ह्यात पक्षाला मिळू शकलेले नाही. तरीही आमचे नेतृत्व झेडपी अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते. त्यानंतरही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुठलीही कसर न ठेवता जिल्ह्यात ताकद दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला यश मिळाले आहे. भाजप हा पराभूत झाला नसून अपेक्षित यश मिळाले नाही, तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे काही मतदारसंघात सहानुभूतीचाही परिणाम झाला आहे, असा दावाही ग्रामविकास मंत्री गोरेंनी केला.
भाजपच्या इच्छुकांनीच अधिकृत उमेदवारांचा पराभव केला : गोरे
सातारा जिल्ह्यातील अनेक गट व गणांमध्ये तिकिटं न मिळाल्यामुळे भाजपच्याच इच्छुकांनी आपल्याच उमेदवारांचा पराभव केला आहे. अशा घटनांचा भविष्यात विचार केला जाणार आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा इशाराही जयकुमार गोरे यांनी दिला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.