Devendra Fadnavis-Sadabhau Khot  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khots Victory : देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला, सदाभाऊ दुसऱ्यांदा विधान परिषदेवर

Vidhan Parishad Election 2024 Results : सदाभाऊ खोत यांनी मागील वेळी विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यांनी अर्ज मागे घेतला होता.

Umesh Bambare-Patil

Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा विजय झाला आहे. त्यांना 26 मते मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊंना दिलेला शब्द या निवडणुकीच्या माध्यमातून खरा करुन दाखला आहे. त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांवर आक्रमकपणे टीका टिपणी करण्यासाठी सदाभाऊंच्या ग्रामीण ढंगातील वक्तत्वाचा लाभ आगामी विधानसभा निवडणुकीत करुन घेण्यासाठी भाजपने त्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे.

सदाभाऊ खोत यांनी मागील वेळी विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यांच्या साथीने मागे घेतलेली दोन पावलं नक्कीच चार पावलं पुढं टाकण्यासाठी असतील, असा विश्वासही सदाभाऊंनी त्यावेळी व्यक्त केला होता. दरम्यान, आज ते पुन्हा दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेल्याने त्यांचे भाजपने पुनर्वसन केले आहे. सदाभाऊंना पहिल्या पसंतीची 14 तर दुसऱ्या पसंतीच 12 मते मिळाल्याने ते विजयी झाले आहेत.

सांगली मरळनाथपूर (ता. वाळवा) या खेड्यातील शेतकरी कटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत ( यांना भाजपमधून दुसऱ्यांदा विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यात शेतकरी चळवळीत एकेकाळी सर्जा-राजाची जोडी म्हणून ओळखले जाणारे शेट्टी आणि खोत यांच्यापैकी सदाभाऊ खोत यांना दुसऱ्यांदा विधीमंडळाच्या सभागृहाचे सदस्य होण्याची संधी मिळाली. मात्र, या जोडीतील राजू शेट्टी यांचा मात्र लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा पराभव झाला आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीत कार्यरत असतानाच त्यांनी उसदरासाठी शेट्टी यांच्यासोबत आक्रमक चळवळीत भाग घेत साखर कारखानदारांना जेरीस आणण्याचे काम केले. यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी माढा लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. एनडीएशी झालेल्या युतीतून विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली.

त्या जागेवर १० जून २०१६ रोजी त्यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली होती. यानंतर आठ जुलै २०१६ रोजी त्यांना मंत्रीमंडळात कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम करण्याची संधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात मिळाली होती. मात्र, विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर त्यांना राजकीय विजनवासात जावे लागले होते.

दरम्यानच्या काळात मंत्रिपदावर असताना त्यांची स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांची संघटनेतून हकालपट्टीही झाली. यानंतर त्यांनी रयत क्रांती ही स्वतंत्र संघटना स्थापन करून शेतकरी, शेतमजूर आणि बाराबलुतेदारांच्या हक्कासाठीचा संघर्ष सुरूच ठेवला. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून एनडीएकडून उमेदवारीही मागितली होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाल्याने त्यांना संधी मिळाली नाही.

विधान परिषदेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपकडे राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. सदाभाऊंच्या माध्यमातून भाजप पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांवर आक्रमकपणे टीका टिपणी करण्यासाठी त्यांचा फायदा करुन घेणार आहे. आता भाजपचे पुढचे लक्ष इस्लामपूर मतदारसंघ असणार आहे. या ठिकाणचे प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना घेरण्यासाठीची ही रणनिती म्हणावी लागणार आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांना माझीउमेदवारी समर्पित करतो. भारतीय जनता पक्ष सर्व घटकांना सोबत घेऊन जाणार पक्ष आहे. १८ पगड जातींना एकत्र ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने या पक्षाने केले आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी चळवळीतील, सामान्य कार्यकर्त्याला एक मोठी संधी भाजपने दिली आहे.

याबद्दल मी निश्चित ऋणी असेन. या पक्षाने रामदास आठवले, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे या सर्व घटकांना, तळातल्या माणसांना वर घेऊन जाण्याचे काम सुरवातीपासून केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT