Solapur, 08 August : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारने आता आपल्याविरोधात 'शेवटचा डाव' आखल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. सोलापूर शहरातील शिवाजी महाराजांवरील भित्तीचित्रांचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार 'ठंडा करके खावो' धोरण स्वीकारत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, "मराठे पहिले राहिले नाहीत, हे या सरकारच्या डोक्यातच येत नाही. मराठे थंड होतच नाहीत, ते कधीही गरमच आहेत. पण आता ते मोठ्या प्रमाणात चवताळले आहेत."
सरकारने नवा डाव रचला असून तो अत्यंत गंभीर असल्याचा दावा जरांगे यांनी केला. "सरकारने सगळे डाव करून पाहिले. आता त्यांनी शेवटचा डाव आखला आहे," असे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या कथित रणनीतीबाबत गंभीर आरोप केले. "रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. आमचा रोडवरील बंदोबस्त काढायचा," असा दावा त्यांनी केला.
आपल्याला या हालचालींची माहिती आधीच मिळाली होती, असेही जरांगे यांनी सांगितले. धाराशिवच्या हद्दीपर्यंत आपल्या रॅलीला रस्त्यावर पोलीस बंदोबस्त होता. मात्र, त्यानंतरचा रोड बंदोबस्त काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
"मला हे रात्री कळालं होतं. आज पहाटे साडेपाचच्या सुमारासही कळालं. सकाळी ते यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. मी कधीच खोटी माहिती देत नाही," असे जरांगे म्हणाले.
अटकेच्या शक्यतेवरूनही जरांगे पाटील यांनी सरकारला थेट आव्हान दिले. "अटक करायला कोण येणार आहे? तू येऊन तर बघ... मग मराठे कोण आहेत दाखवतो," असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, इतरांना ईडीची भीती असेल, मात्र आपल्याला कोणाची भीती नसल्याचेही जरांगे यांनी सूचकपणे सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होत असताना, जरांगेंनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.