

Satara, 07 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ऐन रंगात आली आहे. ठराव दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चुरस दिसून आली आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई या निवडणुकीत उतरणार असल्याने महायुतीमधील तीन पक्षांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. भविष्यात निवडणूक एकत्र लढण्याचे आदेश आल्यास तीनही पक्षांना एकमेकांची मदत आवश्यक असणार आहे. अशातच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडे बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी, शिवसेनेत फोडाफोडी करून विजय मिळवला होता. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या.
त्यावेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना प्रवेशद्वारावरूनच अटक केल्याने ते मतदानापासून वंचित राहिले होते. त्यावेळी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे त्याची चर्चा राज्य पातळीवर झाली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकत्रित बसून तो विषय मिटविला होता. त्यानंतर दोन महिन्यातच सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली.
सातारा-सांगली हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता, मात्र राष्ट्रवादीने ती जागा भाजपला सोडली. त्यावेळी तीनही पक्षांच्या नेतेमंडळींची बैठक झाली होती. त्यात विधानपरिषद निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मागणी भाजपकडे करण्यात आल्याची चर्चा होती.
भाजपकडून राष्ट्रवादीला काय प्रतिसाद मिळाला, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्यावेळी भाजपला जिंकून येण्यासाठी मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. त्यानंतर नुकतेच सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समिती सत्तांतर घडले. तिथे राष्ट्रवादीच्या दोन आणि शिवसेनेच्या दोन सदस्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपला मदत केली. आता सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीतही तिन्ही पक्षांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळणार?
राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळ असून जिल्हा परिषदेत पडती बाजू घेतली. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाऊन आमदारकी मिळविणे राष्ट्रवादीला सहज शक्य होते. मात्र, राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळून भाजपला मदत केली. मिरज पंचायत समितीतही भाजपला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीने तीन ठिकाणी दुय्यम भूमिका घेत भाजपला मदत केली आहे. आता किमान अडीच वर्षांनंतर तरी राष्ट्रवादीला भाजप सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.