Manoj Ghorpade-Dhairyasheel Kadam  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : धैर्यशील कदमांना पुन्हा व्हायचंय भाजपचे जिल्हाध्यक्ष; पण ‘सह्याद्री’तील आमदारासोबतचा ‘तो’ वाद येणार आडवा!

Dhairyasheel Kadam's Statement : जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पुन्हा एकदा पदाची अपेक्षा व्यक्त केली असली तरी कारखान्याच्या निवडणुकीत दुखावलेले आमदार मनोज घोरपडे हे पद कदमांना सहजासहजी मिळू देतील, असे सध्या तरी वाटत नाही.

Vijaykumar Dudhale

Satara, 22 April : भारतीय जनता पक्षाने पुन्हा संधी दिली, तर जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काम करायला तयार आहोत, असे सांगून धैर्यशील कदम यांनी पुन्हा एकदा साताऱ्याचे भाजप जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी घडलेल्या घडामोंडीमुळे कदमांची जिल्हाध्यक्षपदाची वाट सोपी नसणार आहे. त्यांना मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागू शकते, त्यामुळे धैर्यशील कदमांची इच्छापूर्ती होणार का, हा खरा सवाल आहे.

सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील 22 मंडलांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांच्या निवडी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyasheel Kadam) यांनी जाहीर केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांना हे पद दुसऱ्यांदा मिळणार का, हा खरा मुद्दा आहे.

नुकत्याच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे (manoj ghorpade) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकत्र पळणाऱ्या या जोडगळीमध्ये सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत उभी फूट पडली होती. विधानसभा निवडणुकीप्रमाणे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता ताब्यात घेण्याचा या जोडगळीचा प्रयत्न होता. मात्र, अहंकार आडवा आल्याने भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्षांमध्येच फटाफट झाली होती.

जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी काँग्रेसचे निवास थोरात यांच्यासोबत जाऊन सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत युती केली होती. आमदार घोरपडे यांनी ॲड उदयसिंह उंडाळकर पाटील यांच्यासोबत युती करून सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवली होती. या कारखान्याच्या निवडणुकीत एकाच पक्षाचे असूनही आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्यात जोरदार टीका टिपणी रंगली होती.

जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पुन्हा एकदा पदाची अपेक्षा व्यक्त केली असली तरी कारखान्याच्या निवडणुकीत दुखावलेले आमदार मनोज घोरपडे हे पद कदमांना सहजासहजी मिळू देतील, असे सध्या तरी वाटत नाही, त्यामुळे कदमांनी कितीही इच्छा व्यक्त केली तरी स्थानिक आमदार या नात्याने घोरपडे यांचे मत पक्षाकडून विचारात घेण्यात येईल, हेही तेवढेच खरे आहे.

धैर्यशील कदम यांनी नेमकं काय म्हटलंय?

एक वर्षाच्या कालावधीत मी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले आहे. पक्षाने संधी दिल्यास मी जिल्हाध्यक्षपदासाठी पुन्हा इच्छुक आहे, असे धैर्यशील कदम यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT