
Baramati, 22 April : बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा वाढदिवस आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. या वेळी पवारांनी नातू युगेंद्र पवार यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. आज तुम्हाचा वाढदिवस आहे, अभिनंदन. मात्र, एकट्याचे अभिनंदन किती दिवस करायचे...आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, आता लांबवू नका, असे सांगून पवारांनी युगेंद्र पवारांनी लग्न लवकर उरकण्याची सूचना केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. बारामतीत असलेल्या पवारांनी नातवाचा हट्ट पुरवत केक कापून युगेंद्र पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. युगेंद्र पवारांनी आजोबांचे आशीर्वाद घेतले. याचवेळी शरद पवार यांनी नातवाच्या लग्नासंदर्भात भाष्य केले.
पवार म्हणाले, युगेंद्र पवार (YugendraPawar) यांचा आज वाढदिवस आहे. तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे की, माझ्या उपस्थितीत केक कापयचा. मला हजर राहता आलं, याचा मला आनंद आहे. मी विचार करत होतो की, जमाना किती बदलला आहे. लहान गावीसुद्धा आता केक यायला लागले आहेत. केक कापायला लागलेत. लोक त्याच्यात लक्ष घालायला लागले.
मला आठवतंय, माझ्या लहानपणी वाढदिवस असला की, गूळ शेंगदाणे किंवा गूळ खोबरं दिलं जायचं. आता ते सगळे दिवस बदलले आहेत. गेली काही दिवसांपासून तुम्हा लोकांबरोबर युगेंद्र पवारांनी कामाची सुरुवात केली. त्याचा स्वभाव हा लोकांशी नम्रतेनेच बोलण्याचा आणि सुसंवाद ठेवायचा आहे. आपल्या परीने जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असेही शरद पवार यांनी नमूद केले.
युगेंद्र पवार यांची आम्हा लोकांशी तुलना करता कामा नये. मी असो किंवा अजित असो. आमच्यारोबर त्यांची तुलना करता कामा नये. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी आम्ही राजकारणात होतो, त्या वेळी सरकार आमच्या हातात होते. आज युगेंद्र पवार यांना तुमच्यासोबत काम करायचं आहे. पण आज सरकार त्याच्या हातात नाही. त्याच्या हातात कष्ट करायचं, माणुसकीचे संबंध ठेवायचे, लोकांशी संपर्क ठेवायाचा हेच आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ अपेक्षित आहे, सत्तेची अपेक्षा या क्षणी ठेवणे योग्य नाही, असेही पवारांनी सांगितले.
मघाशी सांगितलं, तुझा वाढदिवस आहे, तुझं अभिनंदन. पण एकट्याचे अभिनंदन किती दिवस करायचे? आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, आता लांबवू नका. व्यक्तिगत जीवनात आधार लागतो. तो घरातल्यापेक्षा दुसरा कुठं मिळत नसतो. त्याचा विचार युगेंद्र पवार गांभीर्याने ते करतील, अशी अपेक्षा आहे, असेही पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.