Dhananjay Mahadik to Rahul Gandhi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik to Rahul Gandhi : शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी कोल्हापुरात येणाऱ्या राहुल गांधींवर महाडिकांची प्रश्नांची सरबत्ती!

Rahul Gadkar

Kolhapur Political news : काँग्रेसचे नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहु शस्त्रधारी पुतळ्याच्या अनावर होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या हस्ते हा पुतळा अनावरण होणार असल्याने भाजपकडून त्याला जोरदार विरोध होत आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून राहुल गांधी यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.

राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही त्यांचे स्वागत करतो. मात्र राहुल गांधी यांनी जनतेच्या मनातील काही प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आवाहन धनंजय महाडिक यांनी केले आहे.

धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) म्हणाले, 'खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज समस्त हिंदू समाजासाठी दैवत आहेत. हिंदू धर्माची आणि हिंदू संस्कृतीची निंदा नालस्ती आणि टिंगल करणाऱ्या, तसेच देशाचे तुकडे तुकडे करणाऱ्या गॅंगसाठी राहुल गांधी आदर्श आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आणि हिंदू धर्म रक्षणासाठी औरंगजेब, आदिलशाही, मोगलशाही यासारख्या हिंदू धर्मावर चालून आलेल्या आक्रमकांना धडा शिकवला. राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पराक्रम माहित आहे का..?

तसेच स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य राहुल गांधी यांना लक्षात आहे का..? पुरोगामीत्वाच्या नावाखाली, हिंदू धर्माची कुचेष्टा आणि अवमान होऊ देणार नाही, असे राहुल गांधी मान्य करतात का ? कारण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता राजकारणासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांना कधीच थारा देत नाही, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.' असेही महाडिक यांनी म्हटले आहे.

याशिवाय 'अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात नाच गाणी करण्यात आली, असा तद्दन घाणेरडा आणि खोटा आरोप राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी एका प्रचार सभेत बोलताना केला होता. त्याबद्दल राहुल गांधी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागण्यास तयार आहेत का ? तसेच लोकसभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी, हिंदू म्हणजे असत्य, हिंदू म्हणजे हिंसा अशी विधाने केली होती. हिंदू धर्माचा इतका द्वेष करणाऱ्या राहुल गांधी यांना, हिंदू समाजाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण करण्याची खरोखर इच्छा आहे का ? की केवळ राजकारणासाठी राहुल गांधी ढोंग करत आहेत, याचा खुलासाही करण्यात यावा.' असेही महाडिक म्हणाले आहेत.

काँग्रेसच्या(Congress) काही उथळ नेत्यांनी श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे वक्तव्य केली होती. त्याबद्दल राहुल गांधी आपल्या पक्षाच्या खासदारांना आणि माजी मंत्री असणाऱ्या आमदारांना माफी मागायला लावणार आहेत का? असा माझा तमाम स्वामी भक्तांच्या वतीने त्यांना प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर विशिष्ट समाजाचे अतिक्रमण झाले होते. केवळ मतांसाठी गड किल्ल्यावरील अतिक्रमण पाडण्यास विरोध करून, महाराजांचा अपमान करणाऱ्या आपल्या पक्षाचे खासदार आणि माजी मंत्री असणाऱ्या आमदारांना, राहुल गांधी माफी मागायला लावतील का?, असा तमाम शिवभक्तांच्या वतीने माझा प्रश्न आहे. खासदार राहुल गांधी यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, आपली भूमिका स्पष्ट करावी. तरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा त्यांना नैतिक अधिकार असेल. असेही महाडिक म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजप(BJP)कडून राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरनाला जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असे चित्र आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT