Dharmraj Kadadi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dharmraj Kadadi : काडादींनी वाढविले महाआघाडीतील इच्छुकांचे टेन्शन; ‘दक्षिण’च्या रणांगणात उतरण्याचे थेट संकेत

South Solapur Assembly Constituency : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल आहे, ही शक्यता गृहीत धरून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 26 September : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. आता त्यात सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांची भर पडण्याची शक्यता आहे. काडादी यांनी विधानसभेची आगामी निवडणूक दक्षिण सोलापूर मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असून ते आजपासून दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. काडादी हेच आता दक्षिणच्या मैदानात उतरल्यामुळे काँग्रेसकडील इच्छुकांचे काय होणार, हा खरा प्रश्न आहे.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून (South Solapur Assembly Constituency) लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल आहे, ही शक्यता गृहीत धरून काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. अनेकांनी उमेदवारीसाठी सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि नाना पटोले यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे.

माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, उद्योजक महादेव कोगनुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आदी प्रमुख नेते काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते अमर पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीची गेली काही महिन्यांपासून तयारी चालवली आहे. सोलापूरमधील मातब्बर काडादी घराण्यातील धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi ) हेही निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धर्मराज काडादी यांनी दक्षिण सोलापूरमधून विधानसभेच्या निवडणुकीत उतरावे, यासाठी काही प्रमुख नेत्यांचा आग्रह आहे. तसेच, गेल्या आठवड्यात काडादी यांच्या सोलापूरमधील गंगा निवासस्थानी सिद्धेश्वर परिवाराची बैठक झाली. त्या बैठकीत काडादी यांनी दक्षिण सोलापूरमधून विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह समर्थकांनी केला.

त्या बैठकीनंतर काडादी यांनी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या फॉर्म हाऊसवर जाऊन भेट घेतली होती. काडादी यांना उमेदवारी द्यावी, यासाठी समर्थकांनी शिंदे यांची भेटही घेतली आहे. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अद्याप कुणालाही संकेत दिले नाहीत. धर्मराज काडीत दक्षिण सोलापूरच्या मैदानात उतरले तर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले माने, हसापुरे, बाबा मिस्त्री आणि इतर नेत्यांचे काय होणार, हा खरा सवाल आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमर पाटील हेही दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात अमर पाटील हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असतील, असे संकेत दिलेले आहेत, त्यामुळे दक्षिण सोलापूरमधून काँग्रेसच्या उमेदवारी माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता मात्र वाढली आहे.

लिंगायत अस्मिता

सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीवर झालेली कारवाई, विमानतळासाठी जमीन ताब्यात घेण्यावरून असलेला वाद यामुळे काडादी यांचा भाजप नेत्यांवर राग आहे. याशिवाय सिद्धेश्वर कारखान्याशी लिंगायत अस्मिता जोडली गेली आहे, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामाजिक समीकरण पाहता काडादी यांना निवडणूक लढविण्यासाठी आग्रह होत आहे. त्यांच्यावर समर्थकांकडून दबाव वाढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT