dharmraj kadadi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dharmraj Kadadi : लोकसभेला काँग्रेसचा प्रचार करणारे धर्मराज काडादी 'तुतारी' हाती घेणार?

South Solapur Assembly Election 2024 : कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर धर्मराज काडादी हे राजकीय मैदानात उतरले आहेत. मात्र, ते दक्षिण सोलापूर मतदारसंघातून कोणत्या पक्षातून लढणार, हे अजून ठरलं नाही.

Akshay Sabale

सोलापुरच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा धर्मराज काडादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ( शरदचंद्र पवार ) तिकीटासाठी मुलाखत दिली आहे. काँग्रेसकडून इच्छुक असताना काडादी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे मुलाखत दिल्यानं ते 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांना मताधिक्य मिळाल्यानं, अनेकांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, उद्योजक महादेव कोगनुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आदी प्रमुख काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

मात्र, धर्मराज काडादी यांनी दक्षिण सोलापूरमधून विधानसभेच्या निवडणुकीत उतरावे, यासाठी काही प्रमुख नेत्यांचा आग्रह आहे. यासंदर्भात सिद्धेश्वर परिवाराची बैठकही झाली होती. या बैठकीनंतर काडादी ( Dharmraj Kadadi ) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या फॉर्म हाऊसवर भेट घेतली होती. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अद्याप कुणालाही संकेत दिले नाहीत.

यातच विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 'दक्षिण सोलापूर'साठी धर्मराज काडादी यांनीही मुलाखत दिली आहे. काडादी यांनी प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता. तसेच, ते काँग्रेसकडून निवडणूक लढतील, असं बोललं जात होते. मात्र, काँग्रेसकडून कोणताही 'रिस्पॉन्स' मिळत नसल्याचं पाहून काडादी यांनी 'तुतारी'साठी मुलाखत दिली आहे. दक्षिण सोलापूर हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेस हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देणार का? तसेच, काडादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

शरद पवारांनी निवडणूक लढवण्याबाबत सांगितलं...

याबद्दल धर्मराज काडादी यांनी म्हटलं, "महाविकास आघाडीत सोलापूर दक्षिणची जागा कोणाकडे जाणार माहिती नाही. मी राजकारणात पडणार नव्हतो. पण, शरद पवार यांनी मला निवडणूक लढवावी लागेल, असा निरोप दिला होता. त्यांच्या निर्देशानुसार मी उमेदवारीसाठी मुलाखत दिली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT