Radhakrishna Vikhe Patil leading the morcha at the MSEDCL office
Radhakrishna Vikhe Patil leading the morcha at the MSEDCL office Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

मंत्र्यांनी काय बांगड्या भरल्यात का?

आनंद गायकवाड

संगमनेर ( अहमदनगर ) : महाराष्ट्रात महावितरण प्रशासनाकडून थकीत वीज बिल वसुलीसाठी सक्तीने मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत थकीत वीज बिलधारक शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या संगमनेरमधील महावितरण कार्यालयात जाऊन आज शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. तसेच महाविकास आघाडी व बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. Did the ministers fill the bangles?

राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर शहरातील दिल्ली नाका ते नवीन नगर रस्ता दरम्यान मोर्चा काढला. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा संगमनेर महावितरण कार्यालयावर नेण्यात आला. टाळ मृदुंग वाजत जोरदार घोषणाबाजी करत भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष अॅड. श्रीराज डेरे, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, संगमनेर शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्यासह भाजप कार्यकर्ते, शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

या प्रसंगी विखे पाटील म्हणाले, राज्य सरकारचा सत्तेत आल्यापासून शेतकरी विरोधी कारभार सुरू आहे. अधिवेशने होत नाहीत. अधिवेशनाला सामोरे जाण्याची तयारी नाही. विधीमंडळ सार्वभौम सभागृह आहे. त्यात राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला पाहिजे. तिथे जनतेला न्याय मिळाला पाहिजे. राज्य सरकार त्यापासून पळ काढत आहे. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. लोकशाहीने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, मागील दोन वर्षांपासून समाजाचा कोणताच घटक या सरकारमुळे सुखी नाही. कोविडमध्ये राज्य सरकारने लोकांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक विम्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. व्यापारी वर्ग, छोटे व्यावसायिक कोविडमध्ये उद्ध्वस्त झाले. त्यांना कर्ज द्यायला कोणी तयार नाही. मंदिरे बंद ठेवली होती. त्यासाठी आम्हाला आंदोलने करावी लागली. मात्र शेतकऱ्यांकडे मागील दोन वर्षांपासून उत्पन्नाची साधने नाहीत. सरसकट वीज जोडणी तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सत्तेत आल्यावर वीज बिल माफ करू असे तुम्ही निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात म्हटलं होत. निदान त्याचे तरी भान ठेवा. वर शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. राज्य सरकार नियमबाह्य कृती करत आहे. दुर्दैवाने राज्यात महावसुली सुरू आहे. शेतकऱ्यांना नागविण्याचे काम सुरू आहे. त्याच्या विरोधात आमचे आंदोलन आहे, असे विखे यांनी सांगितले.

राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमुळेच वीज वसुली वेळेत झाली नसल्याचे म्हंटले होते. यावर पत्रकारांनी विचारले असता आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, प्राजक्त तनपुरे हे नवीनच मंत्री झालेले आहेत. त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे. भाजपच्या काळात काय झालं या पेक्षा सध्या सरकार तुमचं आहे. भाजपच्या काळात अशी वेळ कोणावर आली नाही. तुमच्या सरकारचे हे पाप आहे. तुम्हाला जर अनुदान मिळाले नाही अशी तुमची तक्रार असेल तर तुम्ही काय बांगड्या भरल्यात का? तुम्ही तरतूद करा. तुम्ही अनुदान द्या. भाजप सरकारवर आरोप करण्यापेक्षा तुमचे पाप झाकण्यासाठी, तुमची अकार्यक्षमता झाकण्यासाठी आज तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरताय, हे जे तुम्ही पाप करताय याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे, अशी घनाघाती टीकाही विखे पाटलांनी केली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना योजनेच्या स्वरुपात माफी दिली असल्याचे म्हटले होते. यावर विखे पाटील म्हणाले, महसूलमंत्र्यांनामुळात शेतकऱ्यांचे प्रश्न कळलेत का? त्यांच्या वसुलीतून शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ आहे का? ही जी विजेच्या बिलात आपण सवलत, आपत्तीत मदत देतो ही अनेक वर्षांच्या स्थायी आदेशाप्रमाणे देतो. कोणतेही सरकार आले तरी मदत मिळतेच. तुम्ही काय वेगळे केले आहे. तुम्ही शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याचे जे पाप करताय, ते तात्काळ बंद करा. तुमची वसुली तुम्ही थांबवा. जरा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. एवढेच माझे त्यांना सांगणे आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT