Nagar urban bank
Nagar urban bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दिलीप गांधींच्या घरात गुलाल उधळला... पण बँकेवर निर्बंध आले

अमित आवारी

अहमदनगर : नगर अर्बन बँकेतील ( Nagar Urban Bank ) नवीन संचालक मंडळ निवडून येऊन अवघे सहा दिवस झाले आहेत, असे असताना रिझर्व्ह बँकेने ( Reserve Bank of India ) नगर अर्बन बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे सहकार पॅनलच्या विजयामुळे माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरात गुलाल उधळला गेला असला तरी रिझर्व्ह बँकेच्या आजच्या आदेशामुळे ठेवीदारांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत.

या आदेशामुळे आज ( ता. 6 डिसेंबर ) अर्बन बँकेला रिझर्व्ह बँकेला विचारल्या शिवाय कोणतेही आर्थिक करता येणार नाहीत. त्यामुळे नूतन संचालक मंडळाच्या कामकाजावरच मर्यादा आल्या आहेत. नगर अर्बन बॅंकेची स्थापना 1910ला झाली. तेव्हापासून या बॅंकेचा कारभार सुरळीत सुरु होता. मात्र बॅंकेचा एनपीए वाढल्याने तसेच क्रेडिट सोसायटीला कर्ज देण्यास मनाई असतानाही ते दिले गेले. तत्कालीन संचालकांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यामुळे अर्बन बॅंकेवर रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट 2019मध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली होती. अर्बन बँकेने गैरव्यवहार प्रकरणी काही जणांवर गुन्हेही दाखल केले. बॅंकेच्या इतिहासात प्रशासक नियुक्तीची ही पहिलीच वेळ होती. अखेर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक घेतली. यात सहकार पॅनलचा विजय झाला.

नूतन संचालक मंडळाने अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून देऊन अवघे सहा दिवस झाले आहे. अशातच रिझर्व्ह बँकेने नवीन आदेश काढत बँकेच्या आर्थिक कामकाजावर निर्बँध आणले आहेत. त्यानुसार 10 हजारपेक्षा जास्त रक्कमेचे व्यवहार रिझर्व्ह बँकेला विचारून करावे लागणार आहेत.

निर्देशात म्हटले आहे की, आज पासून अर्बन बँकेला रिझर्व्ह बँकेच्या लिखित मंजूरीशिवाय कोणत्याही कर्जाचे आणि अग्रिमांचे नूतनीकरण, कोणतीही गुंतवणूक, निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यासह कोणतेही दायित्व स्वीकारता येणार नाही. म्हणजेच कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. कोणतीही मालमत्ता किंवा मालमत्ता विकणे, हस्तांतरित करणे किंवा अन्यथा विल्हेवाट लावणे हे रिझर्व्ह बँकेलाच विचारून करावे लागणार आहे. बँकेलीत संचालकांप्रमाणेच ठेवीदारांनाही सर्व बचत बँक, चालू खाती, ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील 10 हजार पेक्षा जास्त काढताना अथवा व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेची बंधने असणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध घालताना नगर अर्बन बँकेचा परवाना रद्द केलेला नाही. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवले जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.

नगर अर्बन बँकेला कुलूप लागण्याच्या आधीची ही पहिली पायरी रिझर्व्ह बँकेने चढली आहे.

- शशिकांत चंगेडे, अध्यक्ष, नागरी बँक भागधारक हितसंरक्षण संस्था.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT