Patan News : 'अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तडकाफडकी कपात केलेल्या 61 कर्मचार्यांना पुन्हा तातडीने कामावर घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या असून त्यानुसार कार्यवाहीही झाली आहे'.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज ही माहिती दिली. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली. गरज भासल्यास आणखी कर्मचारी वाढवू परंतु मराठा समाजातील युवकांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी योगदान देत असलेल्या या महामंडळाच्या कामकाजात काही अडचण येवू देणार नाही, अशी ग्वाही भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी (Ekanth Shinde) दिल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले,' मराठा समाजाला उद्योजक बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे मोठे योगदान आहे.राज्यात महामंडळाचे सुमारे ९२ हजार ४९५ लाभार्थी असून त्यांना ७२०१ कोटीपर्यंत बँकांकडून कर्जपुरवठा केला आहे.त्या कर्जापोटी जवळपास ७८० कोटींचा व्याज परतावा महामंडळाकडून करण्यात आला आहे. हे महामंडळ पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने काम करत असून बँकेकडून कागदपत्रांची संपूर्ण पाहणी व तपासणी करूनच बँकांमार्फत कर्ज दिले जाते. त्या कर्जावरील १२ टक्केपर्यंतचे व्याज महामंडळातर्फे दिले जाते.ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी महामंडळामध्ये विभाग,जिल्हा व मुख्य कार्यालय स्तरावर कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मात्र व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांनी कोणतेही स्पष्ट कारण न देता अचानकपणे ६१ कर्मचाऱ्यांची कपात केली. याबद्दल समजताच मी तत्काळ या निर्णयावर आक्षेप घेत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. कर्मचारी कपात केल्याने लाभार्थ्यांची कामे वेळेवर होणार नाहीत.व्याज परताव्यातही दिरंगाई होण्याची भीती आहे हे मी निदर्शनास आणून दिले.त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मला फोन करून माहिती घेतली व वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी बोलविले मी व आमदार रवी फाटक मुख्यमंत्र्यांना भेटलो.त्यांना निवेदन देवून विस्तृत चर्चा केली.कर्मचारी कपात तातडीने मागे घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवाना दिल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
" मराठा समाजातून जास्तीत जास्त उद्योजक तयार होण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून आमची धडपड सुरू आहे.लाभार्थ्यांना कमीत कमी वेळेत व्याज परतावा मिळण्याच्या दृष्टीने गरज भासल्यास आणखीन कर्मचारी वाढवू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून मराठा समाजाचे नुकसान होवू नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत." नरेंद्र पाटील
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.