Ramdas Zhol-Manohar Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manohar Bhosale : मनोहर भोसलेच्या पैशाची विल्हेवाट लावणे भोवले; भाजप नेत्याच्या पत्नीला अटक, भावाचीही चौकशी

Ramdas Zhol Case : भोंदू मनोहर ऊर्फ चंद्रकांत भोसले याच्याशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारप्रकरणी भाजप नेते प्रा. रामदास झोळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पत्नी माया झोळ यांना पोलिसांनी अटक केली.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 17 August : विविध गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेला भोंदू मनोहर ऊर्फ चंद्रकांत भोसले याने अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोण्याच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप नेते प्रा. रामदास झोळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

प्रा. झोळ यांचा शोध सुरू असून त्यांच्या पत्नी माया झोळ यांना कुर्डूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. प्रा. झोळ यांचे मोठे बंधू तथा दत्तकला शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष नवनाथ झोळ यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला इन्स्टिट्यूटमधील महत्त्वाच्या नोंदी असलेली रजिस्टर, संगणक व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून संस्थेतील राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे या दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेले आहे.

भोंदू मनोहर भोसलेविरुद्ध गौतम कसबे (रा. सोलापूर) यांनी २३ एप्रिल रोजी कुर्डुवाडी पोलिसांत जादूटोणा व आर्थिक फसवणुकीची फिर्याद दिली होती. त्यानंतर भोसलेच्या विरोधात करमाळा पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल झाले आहेत. त्या वरून मनोहर भोसले व त्याच्या साथीदाराला अटक केली. आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३(२), ३(३) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(२), ३१८(४), ३(५) आणि १११(२)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपासासाठी विशेष एसआयटी पथकाची नियुक्ती केली होती. तपासात मनोहर भोसले याने जादूटोणा आणि अघोरी पूजेच्या माध्यमातून फसवणूक करून मिळवलेल्या पैशांची विल्हेवाट दत्तकला इन्स्टिट्यूटचे प्रा. रामदास झोळ यांच्या माध्यमातून लावल्याचे तपासात पुढे आले होते.

भावाचीही चौकशी

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने रामदास झोळ यांचे मोठे बंधू तथा दत्तकला शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष नवनाथ झोळ यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी सोलापूरमध्ये बोलावून घेतले होते. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमके काय होणार, याविषयी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT