पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरात विकास कामांची नुकतीच उद्घाटने करण्यात आली. या उद्घाटन कार्यक्रमाला पंढरपूरचे भाजप (BJP) आमदार समाधान आवताडे (samadhan Avtade) यांनाच डावलण्यात आले. त्या मुळे आमदार आवताडे समर्थकांमधून नगरपालिकेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगरपालिकेवर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक (Prashat Paricharak) यांच्या गटाचे वर्चस्व आहे. नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने पंढरपूर शहरातील विविध रस्त्यांची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही कामांचा प्रारंभ परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. पालिकेच्या या कार्यक्रमाला नियमानुसार पंढरपूरचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांना अधिकृतपणे निमंत्रण देणे अपेक्षित होते. मात्र, ते निमंत्रण आवताडे यांना देण्यात आले नाही. त्यामुळे आवताडे समर्थकांनी पालिकेच्या कार्यक्रमावर अक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे परिचारक-आवताडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंची धोबीपिछाड करत विजयश्री खेचून आणला आहे. यामध्ये परिचारकांचा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आवताडे यांना शहरातील विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमापासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आल्याची कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.
याबाबत काही आवताडे समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना जबाबदार धरले आहे. विनोद लटके यांनी या विषयी जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाच्या श्रेयवादावरुन दोन भाजप आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरु झाल्याचे चित्र समोर आले आहे. या वादावर परिचारक कशा पध्दतीने पडदा टाकतात याकडेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.