Baliraja Shetkari Sanghatna Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बळीराजा शेतकरी संघटनेत वाद : नितीन बागल यांच्यासह पाच जणांची हाकालपट्टी

पंजाबराव पाटील आणि बी.जी पाटील यांनी बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली होती.

सरकारनामा ब्युरो

पंढरपूर - शेतकरी संघटनेच्या विभाजनानंतर तयार झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही शकले उडाली. आठ वर्षांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून पंजाबराव पाटील आणि बी.जी पाटील यांनी बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली होती. त्याच संघटनेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ( Dispute in Baliraja Shetkari Sanghatana: Expulsion of five persons including Nitin Bagal )

पंढरपूर येथील नितीन बागल यांनी गेल्याच आठवड्यात बळीराजा शेतकरी संघटनेशी पंजाबराव पाटील आणि बी.जी. पाटील यांचा काही संबंध नाही. आपण स्वतः बळीराजा शेतकरी संघटनेची अधिकृत नोंदणी केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शनिवारी ( ता. 4 ) संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचा आणि नितीन बागल यांचा काडीचाही संबध राहिला नसल्याचे सांगत त्यांच्यासह उमेश देशमुख, रामदास खराडे, साजिद मुल्ला व रमेश गणगे यांची संघटनेतून हाकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्या नंतर आता बळीराजा शेतकरी संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे बळीराजा संघटना नेमकी कोणाची याविषयी आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या संदर्भात बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी शनिवारी (ता.4) पंढरपुरात पत्रकार परिषद घेवून बंडखोर कार्यकर्त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यामुळे संघटनेतील वादाला आणखी तोंड फुटले आहे.

पंजाबराव पाटील म्हणाले की, 9 नोव्हेंबर 2014 रोजी विठ्ठलाच्या साक्षीने पंढरपुरात बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यावेळी पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते संघटनेत सहभागी झाले होते. दरम्यान स्वतःच्या स्वार्थापोटी अनेक पदाधिकारी संघटनेला सोडून ही गेले. तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनेचे काम आजही जोमाने सुरु आहे.

ते पुढे म्हणाले की, ही संघटना प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर भक्कमपणे उभी आहे. तरीही काही लोकांनी संघटनेला बदनाम करण्यासाठी नवीन संघटना काढून स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून जाहीर केले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेशी आणि हाकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांशी काडीमात्र संबंध नाही, त्यामुळे वेगळी संघटना स्थापना करणाऱ्या या कार्यकर्त्यांची बळीराजा संघटनेतून हाकलपट्टी करण्यात आल्याचेही पाटील यांनी जाहीर केले.

उजनीतून इंदापूर-बारामतीसाठी पाणी देण्यास बळीराजा शेतकरी संघटनेचा ठाम विरोध आहे. संघटना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोबत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द करावा, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे सोलापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा बी.जी. पाटील यांनी यावेळी दिला.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, किसन बोचरे, राजेंद्र डोके, जयश्री बोरा, आण्णासाहेब सुपनर, रमेश भोसले, रामेश्वर झांबरे, रमेश लंगोटे आदी उपस्थित होते.

मतदारांना आवाहन

विठ्ठलच्या सभासदांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करावे. सत्ताधारी संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे विठ्ठल साखर कारखाना अडचणीत आला आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी, कामगार आणि ऊसतोड मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सभासदांनी सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात मतदान करावे, असे आवाहन ही पंजाबराव पाटील व बी.जी .पाटील यांनी केले.

'बळीराजा'शी पंजाबवराव पाटील यांचा संबंध नाही

बळीराजा शेतकरी संघटनेची 17 मे 2022 रोजी अधिकृत स्थापना केली आहे. बळीराजा शेतकरी संघटनेशी पंजाबराव पाटील आणि बी.जी पाटील यांचा काहीही संबंध नाही. ही संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. बळीराजा संघटनेची पुणे येथील निबंधक कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी केली आहे. त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटना सर्व सामान्य कार्यकर्त्याची व पदाधिकाऱ्यांची आहे. यापुढे अन्य कोणी बळीराजा संघटनेच्या नावाचा वापर गेल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन बागल यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT