Kolhapur District Bank

 
sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'कपबशी' साठी कायद्याचा काथ्याकूट; अखेर सत्ताधारी गटाने मारली बाजी

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप झाले.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनेल (Kolhapur District Bank Election) ठरवताना मंगळवारी दोन्ही गटातील इर्षा ताणली. त्यानंतर 'कपबशी' चिन्हासाठीही दोन्ही पॅनेलमध्ये वाद झाला. त्यातून कायद्याचा काथ्याकूट करण्यात आला. त्यामुळे शेवटी हे चिन्हच गोठवून दुसरे चिन्ह देण्याचा प्रस्तावावर चर्चा झाली. मात्र, कायद्याचा आधार घेत 'कपबशी' हे चिन्ह सत्तारूढ पॅनेलला देण्यात आले. विरोधकांना 'शिलाई मशीन' चिन्ह मिळाले. मात्र, या घडामोडीमुळे सकाळी निवडणूक कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप झाले. उमेदवारांच्या मागणीनुसार प्राधान्य क्रमाने या चिन्हांचे वाटप करण्यात येते. सत्तारूढ गटाकडून मंगळवारी रात्री उशीरा मेलद्वारे 'कपबशी' चिन्हाची मागणी करण्यात आली. हाच मेल पुन्हा पहाटे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. हेच चिन्ह विरोधी पॅनेलनेही मागितले, तसा लेखी अर्ज घेऊन त्यांचा माणूस सकाळी कार्यालय सुरू होण्यापुर्वीच थांबला होता. चिन्ह वाटपाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ असल्याचा मुद्दा पुढे करत विरोधकांनी सत्तारूढ गटाने मेलद्वारे केलेला अर्ज फेटाळण्याची मागणी केली. चिन्हाच्या मागणीवरुन दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे चिन्हच गोठवण्याचा इशारा दिला.

त्यामुळे कायद्यातील एका तरतुदीचा आधार घेण्यात आला. त्यामध्ये एका पॅनेलच्या उमेदवारांपैकी ३० टक्के उमेदवारांनी एकाच चिन्हाची मागणी केली. असल्यास ते चिन्ह संबंधित पॅनेलला देता येते, अशी तरतुद आहे. सत्तारूढ पॅनेलचे १५ उमेदवार आहेत, यापैकी ३० टक्क्याहून अधिक उमेदवारांनी 'कपबशी' चिन्हाची मागणी केली. त्यानुसार हे चिन्ह त्यांना देऊन यावर तोडगा काढण्यात आला. विरोधी पॅनेलने दुसऱ्या पसंतीचे 'शिलाई मशीन' या चिन्ह मागणी केली होती. त्यांना ते देण्यात आले.

'विमान' साठी रस्सीखेच

या वादानंतर 'विमान' चिन्हासाठीही रस्सीखेच पहायला मिळाली. विरोधी पॅनेलने विमान चिन्हावर दावा केला होता. मात्र, त्यांच्या पुर्वीच पतसंस्था गटातील अपक्ष उमेदवार अनिल पाटील यांचे कार्यकर्ते या चिन्हासाठी अर्ज घेऊन रांगेत वेळेत पोहचले होते. त्यांनी नियमानुसार चिन्ह आम्हाला मिळावे असा आग्रह धरला. प्राधान्यक्रम लक्षात घेऊन चिन्ह पाटील यांना देण्यात आले. पाटील यांच्याबरोबच शिरोळ तालुका विकास संस्था गटातील अपक्ष उमेदवार गणपतराव पाटील, शाहुवाडीतील रणवीर गायकवाड यांनाही 'विमान' चिन्ह देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT