Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राडा झालेल्या आटपाडीत गोपीचंद पडळकरांना दुहेरी धक्का!

सरकारनामा ब्यूरो

आटपाडी : सांगली जिल्हा बॅंकेची निवडणूक आटपाडीतील राड्यामुळे गाजली होती. यासाठी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यांना अटकेची धास्ती आहे. मात्र ज्यासाठी हा सगळा राडा झाला तेथे भाजपसाठी मात्र प्रतिकूल निकाल आहे. येथे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांना महाविकास आघाडीने पराभव केला आहे.

आटपाडी म्हणजे देशमुख, असे समजले जाते. या राजकीय समिकरणाला मोठा धक्का आजच्या जिल्हा बँकेच्या निकालाने बसला. शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी अकरा मतांनी देशमुख यांचा पराभव करून धक्का दिला. हा पराभव श्री. देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जिव्हारी लागणारा मानला जातो. यानिमित्ताने आटपाडी तालुक्यात तानाजी पाटील यांच्या रुपाने तिसरे सत्ताकेंद्र निश्‍चित झाले आहे.

देशमुख यांनी १९९५ मध्ये काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून आमदार अनिल बाबर यांचा पराभव करत आमदारकी खेचून आणली होती. तालुक्याच्या राजकारणात अण्णांचा मोठा दबदबा आणि जनाधार होता. त्यानंतर गेली वीस वर्षे ते विधानसभेला दरवेळी कोणाला तरी पाठिंबा देत आले होते. २०१४ मध्ये त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना मतदारसंघात चौथ्या क्रमांकाची, तर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. गेली पंचवीस वर्षे त्यांच्या गटाकडेच जिल्हा बँकेचे संचालकपद कायम होते.

यावेळी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांना विकास सेवा सोसायटीच्या गटातून उमेदवारी दिली होती. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यासारखी दिग्गज नेते मंडळी त्यांच्यासोबत होती. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजय पाटील यांनीही समर्थन दिले होते.

तानाजी पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि आमदार अनिल बाबर यांनी बळ दिले होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत आटपाडीत मोठा राडा झाला होता. त्यामुळे निवडणुकीकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दोन्ही बाजूंनी मतदारांना अज्ञातस्थळी हलवले होते. मतदानानंतर दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला होता. मात्र तानाजी पाटील यांनी ४० मते घेऊन अकरा मतांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव करत साऱ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. निकालानंतर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आटपाडी गावागावात फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT