Phaltan Sub-District Hospital Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan News : फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरला धक्काबुक्की; माजी मंत्र्याच्या ‘ओएसडी’सह दोघांवर गुन्हा

Threats to Doctors : फिटनेस सर्टिफिकेटच्या वादातून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 03 August : फिटनेस सर्टिफिकेटसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना धक्काबुक्की करणे, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील एकजण हा माजी मंत्र्यांचा ओएसडी असल्याची चर्चा आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने काही महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली आहे. त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेटसाठी आरोग्य अधिकाऱ्याला दमदाटी केल्याने फलटण रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर (वय 27, रा. फितरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख आणि काळे रंगाची सफारी ड्रेस घातलेला सोबतचा व्यक्ती (नाव व पत्ता माहिती नाही) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फलटण उपजिल्हा रुग्णालयात मी 28 जुलै रोजी सकाळी 08 ते 29 जुलै सकाळी 8 अशी 24 तास ड्यूटी होती. ता. 28 जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रसाद प्रदीप कोंडे देशमुख (रा. जावली, जि. सातारा) आणि श्री. परदेशी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि त्यांच्यासोबत इतर तिघे (नाव गाव माहित नाही) असे पाच जण केस पेपर काढून ओपीडीत आले. कोंडे देशमुख आणि परदेशी म्हणाले की, आम्हा दोघांना शस्त्र परवाना काढावयाचा असून त्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट हवे आहे. त्यावर मी त्यांना बीपी व ईसीजी तपासणी करायला सांगितले. त्यानंतर त्यांना फलटण हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ नसल्याने बाहेरून मानसोपचार तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर ते बाहेर गेले.

सायंकाळी सातच्या सुमारास प्रसाद कोंडे देशमुख, परदेशी व त्यांच्या सोबतचे इतर तिघे पुन्हा फलटण उपजिल्हा रुग्णालयात आले. आम्ही मानसोपचार तज्ज्ञांचे मत घेऊन आलो असून आम्हाला फिट फॉरचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली. त्यावेळी मी त्यांना ओपीडीची वेळ संपली असून सध्या इमर्जन्सी पेशंटची वेळ आहे, तुम्ही उद्या सकाळी 9 वाजता या, असे सांगितले. फक्त सही आणि शिक्का तर द्यायचा आहे, द्या की. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, मला तसा सही शिक्का देता येणार नाही. तेव्हा काळ्या रंगाचा सफारी ड्रेस घातलेला व्यक्तीने मला, ‘तुम्हारा नाम क्या है, आप यहा किस पोस्ट पर हो’ अशी विचारणा केली. मी त्याला सांगितले.

त्याचवेळी कोंडे देशमुख यांनी ‘तुमच्या मदने मॅडमचा मोबाईल नंबर द्या,’ अशी मागणी केली. त्या वेळी मी त्यांना ‘मला त्यांचा मोबाईल नंबर देता येणार नाही,’ असे सांगितले. त्यानंतर त्याने मदने मॅडमचा नंबर घेऊन त्यांना फोन केला. मदने मॅडम सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आल्या. त्यांनी कोंडे देशमुख व परदेशी यांना त्यांच्या सही शिक्क्याने फिटनेस सर्टिफिकेट दिले. त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्या ठिकाणी श्रीमती मदने, मी स्वतः कोंडे देशमुख, परदेशी व त्यांच्या सोबतचा एक व्यक्ती होता. इतर दोघे कार्यालयाच्या बाहेर उभे होते.

माझा नंबर द्यायचा नाही, असे मी कधी सांगितले आहे, अशी विचारणा मदने मॅडमनी मला केली. त्यावर हे लोक ओपीडीच्या वेळेनंतर आले आणि नंबर देण्याचे माझे काम नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यावर कोंडे देशमुख माझ्यासोबत अरेतुरेची भाषा करत दमदाटी करू लागले. मला दमदाटी करू नका, असे मी म्हणताच काळी सफारी घातलेली व्यक्ती ‘क्या बोल रहा है’ असे म्हणत माझ्या अंगावर धावून आला. माझी कॉलर धरून सरकारी कामात अडथळा आणत मला धक्काबुक्की केली. ‘मार दूंगा’ अशी हिंदीतून धमकीही दिली, त्यावर मी त्यास ‘मार’ असे म्हणालो.

कोंडे देशमुख यांनी ‘हे तुला खूप महागात पडेल, उद्या सकाळी समजेल तुला मी कोण आहे,’ अशी दमदाटी केली. त्या वेळी मदने मॅडम, शिपाई गणेश तिथे उपस्थित होते. हा सर्व प्रकार कार्यालयात लाईटच्या उजेडात घडलेला आहे. त्यामुळे मी प्रसाद प्रदीप कोंडे देशमुख आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फौजदार विजयमाला गर्जे तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT