

Karmala, 03 August : आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सभासदांचाच असून तो सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लिलाव प्रक्रियेतून कोणीही कारखाना विकत घेण्याचा प्रयत्न करू नये, वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू, प्रसंगी रक्त सांडू. मात्र, सभासद आणि कामगारांच्या घामाचा पैसा कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही, असा इशारा आमदार तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी दिला.
आमदार नारायण पाटील म्हणाले, आदिनाथ साखर कारखाना सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. कारखान्यास कर्ज मिळावे, यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, तालुक्यातील काही अदृश्य शक्तींनी विरोध केल्यामुळे कर्ज मंजूर होऊ शकले नाही. कारखाना सुरू व्हावा, या उद्देशाने भाडेतत्त्वावर चालविण्याचाही पर्याय स्वीकारण्याची तयारी होती; परंतु त्यालाही अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ओंकार शुगरचे बाबूराव बोत्रे पाटील यांच्यावर आमदार नारायण पाटील यांनी गंभीर आरोप करत, सुमारे ४५० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा आदिनाथ कारखाना अवघ्या १२० कोटी रुपयांत लिलावातून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. ओंकार शुगरच्या आडून अन्य कोणी व्यक्ती आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून कारखाना घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही चालू देणार नाही. कोणतीही व्यक्ती अथवा संस्था लिलावातून कारखाना घेऊन तो चालवू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास परवानगी द्यावी किंवा विद्यमान संचालक मंडळाला कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आजही कायम असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यातील राजकारणासाठी सहकाराचे मंदिर असलेल्या आदिनाथ कारखान्याचा बळी देऊ नये. कारखान्याशी निगडित हजारो सभासद आणि कामगारांवर अन्याय होणार नाही, यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक देवानंद बागल, डॉ. हरीदास केवारे, डॉ. अमोल घाडगे, ॲड.राहुल सावंत, किरण कवडे, विजयसिंह नवले, दत्तात्रय गव्हाणे, दत्ताबापू देशमुख, श्रीमंत चौधरी, रवीकिरण फुके, आबासाहेब अंबारे, हनुमंत सरडे, रामेश्वर तळेकर, महादेव पोरे, संतोष खाटमोडे पाटील आदी उपस्थित होते.
उपस्थित संचालक मंडळानेही लिलाव प्रक्रियेला विरोध दर्शवत, आदिनाथ कारखाना सभासदांचाच राहावा, या भूमिकेला पाठिंबा देत आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी एकजुटीने उभे असल्याचे स्पष्ट केले.