Ahmednagar ZP
Ahmednagar ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्हा परिषदेत ठेकेदारांचे वर्चस्व : सर्वसाधारण सभेत वादंगाची चिन्हे

दौलत झावरे

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषदेची निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर आली आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ( ता. 25 ) होणार आहे. या सर्वसाधारण सभेवरून अहमदनगर जिल्हा परिषदे सदस्यांत राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहे. या आरोप प्रत्यारोपांचे पडसाद शुक्रवारी होणाऱ्या सभेत दिसण्याची शक्यता आहे. ( Dominance of contractors in Nagar Zilla Parishad: Controversy in general meeting )

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचा कारभार आता चांगला चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद सदस्यांसह पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेकदा पदाधिकारी व सदस्यांनी कारवाईचा इशारा देऊनही प्रशासन कारवाई करीत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेचा कारभारच ठेकेदारांच्या हाती गेला असल्याचा आरोप आता सदस्य करू लागले आहेत. याचे पडसाद आगामी सभेत पडणार आहेत.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. 25) होणार आहे. या सभेत अनेक विषयांवर चर्चा होणार असली तरी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात सुरू असलेल्या कारभारावर भर राहणार आहे. सध्या बांधकाम विभागात ठेकेदार येऊन त्यांच्या फाइल मंजूर करून घेत आहेत. यामध्ये काही कर्मचारीही ठेकेदारांच्या हाती बिनदिक्कत फाइल देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावरून जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या कारभारावर अनेक सदस्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. बांधकाममधील काही अधिकारी अर्थ विभागात फाइल अडविल्या जात असल्याचे म्हणत आहेत, तर अर्थ विभाग फायली बांधकाम विभागात अडविल्या जात असल्याचे म्हणते आहे. मात्र, फाइल दोन्हीकडेही अडविल्या जात असल्याचा आरोप होत आहे.

जिल्हा परिषदेचा कारभार ठेकेदारांच्या हाती गेलेला आहे. प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. ठेकेदार स्वतःच्या फाइल घेऊन त्या मंजूर करूनच घरी जात असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत पाहायला मिळत आहे. या कारभारात सुधारणा होणे अपेक्षित आहे.

- संदेश कार्ले, सदस्य, जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कारभारात सुधारणा होणे गरजेचे आहे. नियमबाह्य कामे करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. बांधकाममधील कारभारात सुधारणा न झाल्यास याविरोधात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जाब विचारण्यात येईल.

- शरद झोडगे, सदस्य, जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या काही दिवसांपासून बदनाम होत चालला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सदस्यांनाही आता त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या डागाळत चाललेल्या प्रतिमेला उजाळा देण्याची गरज आहे.

- राजेश परजणे, सदस्य, जिल्हा परिषद.

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील फाइल ठेकेदारांच्या हाती दिसून आल्या तर तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

- संभाजी लांगोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

काही ठेकेदारांची दबंगगिरी

काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांची बिलाची फाइल मंजुरीसाठी आल्यानंतर ती पूर्ण करून अर्थ विभागात पाठविली जाते. मात्र, काही ठेकेदार फाइल येण्याच्या अगोदरपासूनच जिल्हा परिषदेत येऊन, तातडीने फाइल करा, असे म्हणत अनेकांचा दबाव वापरत असतात. ठेकेदारांच्या दबंगगिरीला मात्र कर्मचारी वैतागले आहेत. काही ठेकेदारांची सध्या जिल्हा परिषदेत दादागिरी सुरू झालेली असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT