अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद, नगर तालुका पंचायत समिती व नगर तालुका बाजार समितीची निवडणूक जवळ आली आहे. नगर तालुक्यात बाजार समिती भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांची मोठी राजकीय ताकद आहे. कर्डिले हे अस्सल ग्रामीण पद्धतीचे राजकारण करण्यात राज्यात मातब्बर समजले जातात. त्यांच्या समोर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) जिल्हा परिषद, पंचायत समिती व बाजार समितीत आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने आमदार लंके यांनी भोरवाडीत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ( Now Nilesh Lanke's challenge in front of Shivaji Kardile )
भोरवाडी ते अस्तगाव रस्ता, भोरवाडी ते वाणी मळा रस्ता, पाझर तलाव दुरुस्ती, स्मशान भूमी, बस थांबा, बाणूबाई संभा मंडप आदी 3 कोटी 10 लाख रुपयांच्या कामांचे उद्घाटन आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर होते.
आमदार नीलेश लंके म्हणाले की, 2010 मध्ये सरपंच म्हणून सर्वसामान्य नागरिकांचे काम करत राहिलो. विकासकामांच्या माध्यमातून याच नागरिकांनी 2019 मध्ये मला बहुमताने आमदार केले. सरपंच असताना गावातील लोक बरोबर राहिले, तर आमदार झाल्यावर नगर- पारनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व युवा वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक विकासाबरोबर राहिले. यामुळेच भोरवाडीसारख्या छोट्या गावात एकाच वेळी 3 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आज करण्यात आल्याचा आनंद आहे.
आमदार लंके पुढे म्हणाले, की विरोधक म्हणतात, आमदारांनी सव्वा रुपयाचा तरी निधी आणला का ? मग हे 103 कोटी रुपये कोठून आले? आपल्या कोविड काळातील कामाची दखल देशाने घेतली. राज्यातील इतर भागांत बोलावून लोक पुरस्कार देत आहेत ही आपल्या कामाची पावती आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकांत एकविचाराची माणसे निवडून देण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या विचाराची माणसे निवडा, असे आवाहन आमदार लंके यांनी केले.
या प्रसंगी जगन्नाथ भोर, सरपंच भास्कर भोर, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष विद्या भोर, अर्जुन भालेकर, तुकाराम कातोरे, अजय लामखडे, गणेश साठे, गोराभाऊ काळे, बाळासाहेब दळवी, नवनाथ म्हस्के यांच्यासह परिसरातील सरपंच, पारनेरचे नगरसेवक उपस्थित होते.
महाविकास आघाडीला मिळणार बळ
नगर तालुका महाविकास आघाडीच्या एका कार्यक्रमात आमदार नीलेश लंके दिसले होते. आमदार लंके हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे त्यांचे नगर तालुक्यासह नगर शहरातील शिवसैनिकांशी स्नेह आहे. आमदार लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व बाजार समिती निवडणुका यादृष्टीने लंकेंसाठी रंगीत तालीम ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.