Dr. Aniket Deshmukh registered marriage Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Aniket Deshmukh : गणपतआबांच्या नातवाने जपला पुरोगामी विचार; डॉ अनिकेत देशमुखांनी साधेपणाने केले ‘रजिस्टर मॅरेज’

Solapur News : डॉ. अनिकेत देशमुख यांचा धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथील डॉ आस्था हणमंत लाकाळ-पाटील यांच्याशी सहा जून रोजी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोलापुरात ‘रजिस्टर मॅरेज’ केले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 June : आजोबा तब्बल 11 वेळा विधानसभेचे आमदार...भाऊ विद्यमान आमदार...अनेक शैक्षणिक संस्था ताब्यात...सूत गिरणी...बाजार समिती...खरेदी विक्री संघावर अनेक वर्षांपासून वर्चस्व...संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असणारे घराणे...राज्याच्या राजकारणात आजही माजी आमदार (स्व) भाई गणपतराव देशमुख यांचे नाव आदराने घेतले जाते. साधी राहणी आणि पुरोगामी विचारसरणी ही गणपतआबांची ओळख. तीच ओळख गणपतआबांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांनी अधिक ठळक केली असून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत डॉ अनिकेत यांनी ‘रजिस्टर मॅरेज’ (नोंदणी विवाह) केले आहे. साधा नगरसेवकही मोठ्या थाटामाटात आणि झगमगटात लग्नकार्य करत असताना डॉ अनिकेत यांनी साध्या पद्धतीने लग्न करून गणपतआबांचा पुरोगामी विचार जोपासल्याचे दिसून येते.

डॉ. अनिकेत देशमुख (Dr. Aniket Deshmukh) यांचा धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथील डॉ आस्था हणमंत लाकाळ-पाटील यांच्याशी सहा जून रोजी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोलापुरात ‘रजिस्टर मॅरेज’ केले. डॉ. अनिकेत यांचे वैद्यकीय शिक्षण सोलापुरातील डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. सध्या ते सोलापुरातील महिला हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करत आहेत. राजकीय वारसा लाभलेले डॉ अनिकेत सध्या वैद्यकीय सेवेत रमले आहेत.

सांगोला (Sangola) मतदारसंघातून डॉ अनिकेत देशमुख यांनी 2019 च्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत डॉ. अनिकेत यांचा अवघ्या 768 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीत त्यांनी बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते.

डॉ अनिकेत देशमुख यांचे आजोबा गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघातून अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते एसटी बसनेही प्रवास करायचे. तोच साधेपणाचा विचार डॉ. देशमुख यांनी जोपासला आहे. तसेच, बंधू डॉ. बाबासाहेब हे सध्या सांगोल्याचे आमदार आहेत. अशा मोठ्या राजकीय परंपरेचा वारसा असलेले डॉ अनिकेत यांनी कोणताही डामडौल, बडेजाव न करता नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.

अशी झाली ओळख

डॉ. आस्था लाकाळ-पाटील ह्या सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनिकेत देशमुख हे हाडाचे डॉक्टर आहेत. डॉ. आस्था यांच्या वडिलांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात सेकंड ओपिनियन घेण्यासाठी त्या डॉ. अनिकेत यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी दोघांची भेट झाली. तत्पूर्वी सोशल मीडियावर ते एकमेकांना ओळखत होते. त्या भेटीनंतर दोघांमध्ये संवाद वाढत गेला. त्यातून दोघांनी एकमेकांना जीवनसाथी बनविण्याचा निर्णय घेतला.

डॉ अनिकेत देशमुखांची सोशल मीडियावर धूम

डॉ अनिकेत आणि डॉ आस्था यांच्या नोंदणी पद्धतीच्या विवाहाची सोशल मीडियात मोठी चर्चा सुरू आहे. मोठ्या राजकीय परंपरा असलेल्या डॉ अनिकेत यांच्या साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णयाचे सोशल मीडियातून स्वागत होत आहे. तसेच, त्यांनी गपणतराव देशमुख यांचा साधेपणा जपल्याचा त्यात आवर्जून उल्लेख केला जात आहे. डॉ अनिकेत यांच्या साधेपणाचं कौतुक होत आहे.

दिखाऊपणा करावा, असं कधी वाटलंच नाही : डॉ अनिकेत देशमुख

नोंदणी विवाहासंदर्भात डॉ अनिकेत देशमुख म्हणाले, डामडौल, उधळपट्टी, दिखाऊपण ह्या गोष्टी आमच्या घराण्याने कधीही केलेल्या नाहीत. आमचे आजोबा, वडिल आणि आम्ही (मी आणि बंधू डॉ. बाबासाहेब) आजही साध्या पद्धतीने सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगतोय. मोठ्या थाटामाटात लग्न करावे, दिखाऊपणा करावा, असं कधी वाटलंच नाही. हा नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा विचार माझ्या एकट्याच नव्हता, तर डॉ आस्था यांचाही तोच विचार होता, त्यातून आम्ही दोघांनी मिळून नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT