Solapur, 06 March : विधीमंडळाच्या आवारात (स्व.) गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारण्याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूतोवाच केले होते. त्याला दोन-अडीच वर्षांचा काळ लोटला तरी अद्याप स्मारकाच्या कामाबाबत कोणतीही हालचाल होऊ शकलेली नाही, त्यामुळे गणपराव देशमुखांचे स्मारक कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत गणपतआबांचे नातू आणि सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला स्मारकाबाबतची आठवण करून दिली.
मुंबईत सध्या अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरू आहे. त्या अधिवेशनात आपापल्या मतदारसंघातील कामाबबत लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करत आहेत. सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांनीही गेल्या तीन दिवसांत ठिबक अनुदान, छावणी चालकांची प्रलंबित बिले, सांगोला तालुक्यातील माण, कोरडा नद्यांना कालव्याचा दर्जा देऊन कायमस्वरूपी पाणी सोडावे. प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन उभारावे, शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, दूध उत्पादकांना तिसऱ्या टप्प्यातील अनुदान द्यावे. कर्नाटकाच्या धर्तीवर दुधाला कायमस्वरूपी तीन रुपये अनुदान द्यावे, सांगोल्याला नवीन २५ एसटी बस मिळाव्यात, जिल्हा परिषदेच्या शळांची दुरुस्ती करावी, अशा मागण्या केल्या आहेत.
सांगोल्यातून प्रथमच निवडून आलेले डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. या स्मारकाबाबत हालचाली होत नसल्याने मराठी माणूस दुःखी होत आहे. हे स्मारक तातडीने उभारण्यात यावे. तसेच, मुंबईत विधीमंडळाच्या आवारात सांगोल्यातून अकरा वेळा निवडून आलेले (स्व.) गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh)यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ते स्मारक लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी केली होती.
सांगोल्यातील गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांस भेटायला आले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या आवारात देशमुख यांचे स्मारक असावे, अशी संकल्पाना २०२१ मध्ये मांडली होती. पुढे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस हे २०२३ मध्ये देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सांगोल्यात आले होते.
त्या वेळी त्यांनी विधीमंडळाच्या आवारात भाई गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याबाबत सर्वांचं एकमत झालं आहे. पण, चर्चा एकाच विषयावर थांबली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोडला तर कुठलाच पुतळा कोणाला दिसत नाही. त्यामुळे सर्वांना दिसेल अशा ठिकाणी आबासाहेबांचे स्मारक उभारण्यात येईल. विधानमंडळात येणाऱ्या आमदाराला त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल, असे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
दरम्यान, त्याच मुद्यावरून गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्मारकाबाबत आज अशिवेशनात सरकारला आठवण करून दिली. त्यात त्यांनी तातडीने स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती, त्यामुळे डॉ. देशमुखांच्या स्मारकाला सुरूवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण होते गणपराव देशमुख?
(स्व) गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे सच्चे आणि निष्ठावंत आमदार होते. दुसऱ्या पक्षाकडून ऑफर असतानाही त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहणे पसंत केले. देशमुख हे 1962 रोजी पहिल्यांदा सांगोल्यातून निवडून आले होते. तेव्हापासून फक्त दोन पराभव वगळता ते अकरा वेळा सांगोल्यातून निवडून आले होते, त्यामुळे सांगोला आणि गणपतराव देशमुख हे समीकरण बनले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.