<div class="paragraphs"><p>Durga Tambe</p></div>

Durga Tambe

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

दुर्गा तांबे म्हणाल्या, बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये चांगले काम होतय...

​ मुरलीधर कराळे

अहमदनगर : संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. दुर्गा तांबे या अहमदनगरमधील 'सकाळ' कार्यालयात आल्या असता त्यांनी मनमोकळ्या चर्चा करताना विरोधकांचे आरोप खोडून काढले. Durga Tambe said, good work is being done in Sangamner through Balasaheb Thorat ...

नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, की संगमनेर शहराचे प्रतिनिधित्त्व मागील 15 वर्षांपासून करते. या शहरात असलेली मोठी बाजारपेठ विकासाला पूरक आहे. शहर सुंदर आहे. अजूनही ते फुलवायचे आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून येथे चांगले काम होत आहे, याचा निश्चितपणे अभिमान आहे.

चांगल्या बाजारपेठेमुळे कोंडी

शहरातील वाहतुकीच्या कोंडीबाबत तांबे म्हणाल्या, की शहरात बाजारपेठ मोठी आहे. येथे नाशिक, अहमदनगर शहर, पुणे जिल्ह्यातून व्यापारी खरेदीसाठी येतात. मंगल कार्यालये सुंदर आहेत. त्यामुळे शेजारील जिल्ह्यांतील विवाह येथे होतात. बाजार समिती मोठी आहे. टोमॅटो, डाळिंब तसेच इतर मालाची मोठी विक्री होते. सोन्याचीही बाजारपेठ आहेच. विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. साहजीकच वाहतूक कोंडी होते. त्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. पोलिस प्रशासनानेही याबाबत अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

दररोज पहाटे वाचन

एका प्रश्नाला उत्तर देताना तांबे म्हणाल्या, की माझ्या माहेरी आजोबा संतूजी थोरात त्या काळातील इंग्रजीतून मॅट्रिक झाले होते. घरी ग्रंथालय होते. विविध पुस्तकांचा खजिनाच घरात होता. त्यामुळे लहानपणापासून वाचनाचा छंद जडला. तो कायम राहिला. दररोज पहाटे वाचन करते.

धुळीचे शहर ही ओळख पुसली

भौगोलिक परिस्थितीमुळे शहरात धूळ कायम असायची. मोठ्या बाजारपेठेमुळे कायम वाहनांची वर्दळ असायची. त्यामुळे धूळ होते. आता मात्र रस्ते चांगले झाल्याने ही ओळख पुसली आहे. याउलट शहर हरित झाले. दरवर्षी वृक्षारोपण होते. रस्त्यांचे काँक्रिटिकरण झाले. आता धूळ दिसत नाही.

नव्वद टक्के कर वसुली

संगमनेर नगरपरिषदेची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच विविध करांची नव्वद टक्के वसुली आहे. लोक स्वतःहून कर भरतात. त्यांना सुविधाही चांगल्या मिळतात. महिलांसाठी बचतगटांच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या. शहरात आजही ६०० बचतगट कार्यरत आहेत. ठिकठिकाणी पाण्याचे एटीएम मशिन आहेत. तेथे अत्यल्प दरात शुद्ध पाणी दिले जाते. कोरोनामुळे काही अंशी वसुलीला अडचणी आल्या; परंतु त्या तुरळक आहेत.

आईच्या हातचं पिठलं भाकरी

माहेरी वातावरण खूपच मोकळे असायचे. सर्वधर्मियांचा वावर घरात असायचा. आलेल्या लोकांना आई जेऊ घालायची. टोपलेभर भाकरी अन् पातेलंभर पिठलं घरात कायम असायचे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आमच्या घरी यायचे. त्यांनी पिठलं-भाकरीबाबत जे काव्य रचले ते आईच्या उपक्रमावरूनच, अशी आठवणही त्यांनी सांगितले.

‘ग्रीन सिटी, क्लिन सिटी व गार्डन सिटी’

‘‘माझ्या प्रचाराच्या एका सभेत वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरविषयी एक स्वप्न पाहिले होते. ‘ग्रीन सिटी, क्लिन सिटी व गार्डन सिटी’ व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मी त्याच स्वप्नाच्या मागे धावत कामे करत आहे. संगमनेर सुंदर शहर बनले आहे. अजूनही खूप काम करायचे आहे,’’ अशा आठवणी सांगत संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी विकासाच्या अनेक प्रकल्पांबाबत मनमोकळा संवाद साधला.

संगमनेर मुख्यालय व्हावे

जिल्हा विभाजन हा आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रशासकीयदृष्ट्या संगमनेर शहर सोयीचे आहे. शासकीय कार्यालयाच्या अनेेक इमारती येथे आहेत. विभाजन झाल्यास मुख्यालय संगमनेरलाच व्हावे, अशी अपेक्षा आहे. संगमनेर जिल्हा झाल्यास शहरात महापालिका होईल. मलाही महापौर व्हायला आवडेल असेही तांबे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT