Dushere Society Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politics : डॉ. भोसले गटाने काढले उट्टे; बहुमत असूनही काँग्रेसने 'सोसायटी' गमावली

Vishal Patil

Karad News : कराड तालुक्यातील दुशेरे विकास सेवा सोसायटीत काॅंग्रेसकडे स्पष्ट बहुमत असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसचा एक सदस्य फुटला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उंडाळकर, मोहिते गटाने दीड वर्षापूर्वी एकत्र येऊन मिळविलेली सत्ता हातची गेली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी डॉ. अतुल भोसले गटाने जबरदस्त राजकीय खेळी करत सोसायटीतील काँग्रेसप्रणित सत्तेला सुरुंग लावला. (Dushere Society's president election congress's one vote was split)

दुशेरे विकास सेवा सोसायटीची दीड वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत कृष्णा साखर कारखान्याचे संचालक आणि डाॅ. अतुल भोसले समर्थक धोंडिराम जाधव यांच्या गटाला हादरा देत काॅंग्रेसने सत्तांतर केले होते. काँग्रेसला सात आणि धोंडिराम जाधव यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या होत्या. पहिले दीड वर्ष अध्यक्षपद मिळाल्यानंतर आता पुन्हा काॅंग्रेसलाच अध्यक्षपद मिळेल, असे असताना विरोधकांचा विजय झाल्याने काॅंग्रेसचा कोणता संचालक फुटला, याबाबत आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुशेरे विकास सेवा सोसायटीसाठी काँग्रेसकडून भीमराव पवार यांना अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी सुषमा जाधव यांना संधी देण्यात आली होती. काँग्रेसच्या गटाने ठरवलेल्या कालावधीनंतर भीमराव पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला. नूतन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सकाळी झाली. बुधवारी रात्री गावात राजकीय घडामोडी घडल्याने अध्यक्ष निवडीत धोंडिराम जाधव यांनी काँग्रेसप्रणित गटाला हादरा देत पुन्हा सत्तेच्या चाव्या ताब्यात घेतल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस. थत्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत काँग्रेसकडून चंद्रकांत बाळासाहेब जाधव यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. धोंडिराम जाधव यांच्या गटातून चंद्रकांत सर्जेराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. छाननीत अर्ज वैद्य ठरल्यानंतर मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतमोजणीत काॅंग्रेसच्या जाधव यांना सहा मते मिळाली, तर विरोधी चंद्रकांत पाटील यांना सात मते मिळाली. काॅंग्रेसच्या विरोधातील उमेदवाराला सात मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी थत्ते यांनी चंद्रकांत पाटील यांना विजय घोषित केले.

विजयाची घोषणा होताच डाॅ. अतुल भोसले यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा धोंडिराम जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सीताराम जाधव, भास्करराव जाधव, शिवाजीराव गोपाळा जाधव, सर्व संचालक, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

दुशेरे येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे संचालक ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते, इंद्रजित मोहिते यांनी एकत्रित येत विरोधातील डाॅ. अतुल भोसले समर्थक धोंडिराम जाधव यांना आव्हान दिले होते.

सत्तेत असलेल्या डाॅ. भोसले यांच्या समर्थकांचा पराभव झाल्याने सोसायटीत सतांत्तर झाले होते. या विजयानंतर पहिल्या दीड वर्षासाठी काॅंग्रेसच्या उमेदवाराला अध्यक्षपद दिले होते. त्यानंतर आता फेरनिवडणुकीत काॅंग्रेसचे एक मत फुटल्याने काॅंग्रेसला धक्का देत डाॅ. भोसले समर्थकांनी सोसायटीत कमबॅक करत अध्यक्षपद मिळवले.

Edited By-Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT