खटाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला धक्का देणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. प्राध्यापक पदोन्नतीसाठी लाखोंची लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका खासगी इसमाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईदरम्यान संस्थेचे अध्यक्ष आणि महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर अशा दोन लोकसेवकांनाही ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत मदत करण्याच्या नावाखाली मोठी आर्थिक मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. पदोन्नती प्रक्रियेत समितीचे अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठात हजर राहणे किंवा प्रतिनिधी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी रवींद्र गणपत पवार या खासगी व्यक्तीने 3 लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. चौकशीत असेही समोर आले की, ही रक्कम चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील यांच्यासाठी मागितली जात असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या व्यवहारासाठी महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर अनिल सदाशिव गुजर यांनीही सहकार्य केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपूर्ण प्रकरणाची गुप्त पडताळणी केली. प्राथमिक तपासात तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी ठरलेल्या ठिकाणी पंचांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
या वेळी रवींद्र पवार यांनी तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले. या घटनेनंतर पुढील चौकशी करत संस्थेचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील आणि ग्रंथालय परिचर अनिल सदाशिव गुजर यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पदोन्नतीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेतही लाचखोरी होत असल्याचे समोर आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.