Mumbai, 28 July : राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे. गेली वर्षे-दीड वर्षापासून शिवसेनेच्या मंत्र्यांनी कोणत्या योजना राबविल्या आणि त्याचा परिणाम याबाबत शिंदेंनी आपल्या शिलेदारांच्या कामाची झाडाझडती घेतली. यात पहिलाच नंबर सध्या चर्चेत असलेल्या शिक्षण विभागाचे मंत्री दादा भुसे यांचा लागला आहे. शिंदे आपल्या मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन करून समाधानकारक काम नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलात डच्चू देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्य मंंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात पक्षाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली. त्याला पक्षाच्याच आमदारांकडून कामे होत नसलेल्या तक्रारींचीही पार्श्वभूमी आहे. तसेच, आगामी फेरबदलासंदर्भात मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती शिंदेंकडून घेतली जात असल्याची माहिती आहे.
मंत्र्यांच्या कामाचा आढावा बैठकीत विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प, योजनांची अंमलबजावणी आणि भविष्यातील प्राधान्यक्रम यावर चर्चा झाली. प्रत्येक विभागाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात आहे. प्रत्येक मंत्र्याने शपथ घेतल्यापासून केलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. त्यासाठी सर्व मंत्र्यांना आपापल्या विभागात घेतलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी याचा अहवाल घेऊन बोलावण्यात आलेले आहे.
या झाडाझडतीमध्ये पहिलाच नंबर सध्या चर्चेत असलेल्या शिक्षण विभागाचे मंत्री दादा भुसे यांचा लागला आहे. या विभागाचा आढावा घेताना मंत्री भुसे यांच्यासह त्यांचे सर्व ओएसडी आणि खासगी सचिव उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
अनेक मंत्र्यांकडे असलेल्या विभागात शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नसल्याची तक्रारी शिंदेंकडे गेल्या होत्या. त्यामुळे कामचुकार मंत्र्यांना डच्चू देण्यासह शिंदे हे शिवसेनेकडील मंत्र्यांच्या खात्यात भाकरी फिरवणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या विभागात नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी शिंदे यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे.
आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अडीच वर्षांनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल होणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे कामचुकार मंत्र्यांना नारळ देऊन नव्या लोकांना संधी देण्याचा निर्णय होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.